बिडकीन: महाराष्ट्र पोलीस दलात सेवा बजावत असलेले आणि छत्रपती संभाजीनगर नियंत्रण कक्षात सहायक फौजदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी रियाज अब्दुल रहेमान शेख यांच्यावर आज (ता.०२) शनिवार रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रियाज अब्दुल रहेमान शेख (५५) रा.हवालदार गल्ली,बिडकीन,ह.मु.छत्रपती संभाजीनगर असे मयत झालेल्या पोलीस अधिकारी यांचे नाव होते.
रियाज शेख हे ग्रामीण नियंत्रण कक्षात सहायक फौजदार पदी काम करत होते. काल रात्री उशिरा टीव्ही सेंटरकडून आझाद चौकाकडे जात असताना शक्तिमान वॉशिंग सेंटर जवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात त्यांचे दुःखद निधन झाले होते. याबाबत सिडको पोलीस पुढील तपास करत आहे. सहायक फौजदार रियाज शेख यांच्या पार्थिवावर आज पैठण रोडवरील हजरत निजामोद्दीन अवलिया दर्गा परिसरातील कब्रस्तान येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी शासकीय पद्धतीने सलामी देत पुष्प चक्र अर्पण करत मानवंदना दिली. यावेळी बिडकीन पोलीस ठाणे येथील सहायक फौजदार सोमनाथ तांगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप साळवे, पोलीस नाईक विष्णू गायकवाड, पोलीस कर्मचारी योगेश वाघमोडे, गोपनीय शाखेचे शेखर जाधव आदींचा सहभाग होता.छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील शोक सलामी पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश राजेंद्र भावसार, रवींद्र गुलाब तायडे, नारायण मुंडे, अरुण वाघचौरे, राजेंद्र चव्हाण, कृष्णा सोनवणे, गणेश बोराडे, शुभम नितांगे, संजय चव्हाण आदींच्या पथकाने शोक सलामी देत ०३ वेळा गोळ्या झाडत सलामी देत मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सह शहरी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. बिडकीन आणि परिसरातील समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.