नवी दिल्ली : प्रत्येकाला कशा ना कशाची भीती वाटते. कुणाला अंधाराची, उंचीची, कुणाला एकटं राहण्याची तर कुणाला एखाद्या जीवाची. पण कुणाला कधी फळांची भीती वाटत असल्याचं तुम्हाला सांगितलं तर...
साहजिकच आश्चर्य वाटेल. पण एक महिला जिला केळ्याची भीती वाटते. त्यातही आश्चर्यकारक म्हणजे ही महिला एक राजकीय नेता आहे ती लैंगिक समानता मंत्री आहे.
स्वीडनच्या लैंगिक समानता मंत्री पॉलिना ब्रँडबर्ग. केळं खाणं तर दूरच, पण केळं पाहिलं तरी त्यांना अस्वस्थ होतं. त्यामुळे त्या जिथं जाणार असतील तिथं एकही केळं त्यांच्या दृष्टीस पडणार नाही, याची काळजी घेतली जाते. नाही तर केळी पाहून त्या थरथर कापायला लागतात. हे वाचल्यावर अनेकांना हसू येईल. पण यामागील कारण काय हे जाणून घेण्याची उत्सुकताही तितकीच असेल.
महिला मंत्र्याला बनाना फोबिया
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पॉलिना यांनी एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2020 साली त्यांच्या बनाना फोबियाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट काही दिवसांनी डिलीट करण्यात आली. त्यात त्यांना बनाना फोबिया अर्थात केळ्याची भीती वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
एक्स्प्रेसन या स्थानिक मीडिया आउटलेटच्या हाती काही लीक झालेले ईमेल्स लागले आहेत. मीडिया आउटलेटच्या हाती लागलेला ईमेल व्हीआयपी लंचबाबतचा आहे. त्यात मंत्री पॉलिना यांनी त्यांच्या अधिकृत दौऱ्यांच्या आधी त्या त्या ठिकाणी केळी ठेवू नयेत असं कर्मचाऱ्यांना सांगितल्याचा उल्लेख आहे. त्यांनी जेवणामधून केळी बाजूला काढायला सांगितली आहेत.
काय आहे बनाना फोबिया?
मंत्री पॉलिना यांनीही एक्स्प्रेसनला त्यांच्या फोबियाबद्दल सांगितलं आहे. ही एक प्रकारची भीती असून एखाद्या अॅलर्जीसारखा हा आजार आहे. त्याबाबत वैद्यकीय मदत घेतली जात आहे. अशा प्रकारची भीती कोणाच्या मनात कशी बसते याबाबत अजून डॉक्टरांनाही संपूर्ण माहिती नाही; मात्र बालपणातील काही अनुभवांशी याचा संबंध असू शकतो, असा अंदाज आहे.स्वीडनच्या आणखी एक राजकीय नेत्या टेरेसा कार्व्हालो यांनी त्यांनाही असाच बनाना फोबिया असल्याचं त्यांनी 'एक्स'वर म्हटलं होतं. हा फोबिया अतिशय दुर्मीळ आहे. या विचित्र आजारानं ग्रस्त असलेली व्यक्ती जेव्हा केळी पाहते, तेव्हा ती व्यक्ती भीतीनं थरथर कापू लागते. त्या व्यक्तीला काळजी वाटू लागते. जीव घाबरा होतो, गुदमरू लागतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.