आमदार फोडाफोडीचे राजकारण होत होत पहिले. आता नुसते फोडाफोडीवर राहिले नाही आता पक्ष, चिन्ह पळवतात. एकनाथ शिंदेनी नाव घेतलं, चिन्ह घेतलं. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांची प्रॉपर्टी नाही ती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी आहे.
असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे व ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच माझे मतभेद असले तरी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे शरदचंद्र पवार यांचे अपत्य आहे असे सांगत राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरे यांनी समाचार घेतला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सभा घेत प्रचाराचे रणशिंग सोमवारी फुंकले. यावेळी मनसेचे उमेदवार आमदार राजू पाटील, उल्हास भोईर, संगीता चेंदवणकर, भगवान भालेराव या उमेदवारांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सभा घेणाऱ्या राज यांनी त्यांच्यावरही तोफ डागली.
काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध निवडणूक लढले आणि नंतर त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, श्वास गुदमरतो म्हणत त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार त्यांच्याच मांडीवर येऊन बसले. आता काहीच करू शकत नाही. शेतकरी आत्महत्या करतात तरुण काम मागतात याचं त्यांना काही वाटत नाही ते फक्त मज्जा करत आहेत. कारण या पक्षांनी मतदारांना गृहित धरलं आहे. तुम्ही चिडत नाही. तुम्हाला काहीच वाटत नाही. त्यामुळे आपण काहीही केलं तरी चालतं, असा यांचा समज झाला आहे, अशा शब्दांत राज यांनी मतदारांना डोळसपणे मतदान करण्याचं आवाहन केलं.
राज्यातील युती आघाडीवरून ते बोलले कोणी कोणाशी अभद्र युती करतो, कोणी कोणाशी अभद्र आघाडी करतो. फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते आमचे शरदचंद्र पवार आहेत. पहिल्यांदा 1978 ला काँग्रेस फोडली. 1992 ला शिवसेना फोडली, 2005 ला परत नारायण राणेंना फोडला, तिकडे पण आमदार फोडले. फोडाफोडीचे राजकारण होत होत. ते आता पुढे गेल सगळं, आता नुसत फोडाफोडीवर राहिल नाही.
आता पक्षच ताब्यात घ्यायचा, त्यांचे निशाणीच ताब्यात घ्यायची, तुमचं नावच ताब्यात घ्यायचं. असं मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदेनी नाव घेतल, निशाणी घेतली. अजित पवारांनी नाव घेतलं, निशाणी घेतली. त्याला कसले हात घालता. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही आमदार फोडून राजकारण करायचे करा. माझे किती मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह शरद पवारांचा अपत्य आहे. ते अजित पवारांचा अपत्य नाहीये. महाराष्ट्राची वैचारिक घसरण झाली आहे. महाराष्ट्राकडे सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिले जायचं. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्या महाराष्ट्राची ही दशा झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणाचा अक्षरश: विचका झाला. विधानसभेत माझा केवळ एक आमदार होता. तो विकणारा नव्हे, तर टिकणारा निघाला, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्याच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं. माझा एकच आमदार होता. माझी निशाणी घेऊन गेला असता. पण असले विचार माझ्या नेत्यांच्या मनाला कधी शिवतही नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना नाव न घेता लक्ष्य केलं.2019 मध्ये लोकांनी मतदान केलं. तेव्हा युतीत कोण होतं, आघाडीत कोण होतं आणि आता युतीत कोण आहे, आघाडीत कोण आहे, याचा मतदारांनीच विचार करावा. मतदान करताना 5 वर्षांत काय काय घडलं याची मनात उजळणी करावी, असं आवाहन राज यांनी केलं. मतदारांना कशाचंच काही वाटत नाही. त्यामुळे आम्ही कोणासोबतही गेलो तरी चालतं, असा पक्षांचा समज झाला आहे. त्यांचा हा समज मोडीत काढलात तर ते वठणीवर येतील, असं राज ठाकरे म्हणाले.मागील विधानसभा निवडणुकीत लोकांनी युतीला कौल दिला. पण निकाल लागताच उद्धव ठाकरेंनी वेगळा सूर लावला. आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता, असं ते म्हणू लागले. तुम्हाला जर शब्द दिला होता, तर मग पंतप्रधान मोदी, अमित शहा सभा घेऊन पुढील मुख्यमंत्रीही फडणवीसच होतील, असं जाहीर सभेत सांगत असताना गप्प का होतात? तेव्हाच आक्षेप का घेतला नाही?, असे सवाल राज यांनी उद्धव यांना विचारले.
मुंबईतील कुर्ल्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली. त्या सभेतील एक क्लिप मी पाहिली. व्यासपीठावर शिंदेंचा फोटो, त्यांच्या उमेदवारांचं नाव आणि मंचावर एक तरुणी भोजपुरी गाण्यावर नाचतेय. हीच का तुमची लाडकी बहीण योजना? असा सवाल राज यांनी विचारला. राजकीय व्यासपीठांवर बायका नाचवण्याचे प्रकार उत्तर प्रदेश, बिहारमध्ये घडतात. आपल्याला महाराष्ट्राचा यूपी, बिहार करायचाय, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.