संविधानावरून मोदींचा पुन्हा मास्टरस्ट्रोक? महत्वाची माहिती उजेडात आणणार...
हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दोन्ही राज्यांत तसेच लोकसभा निवडणुकीतही विरोधकांनी संविधानाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. त्यानंतर आता मोदी सरकारकडून विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी संविधानाशी संबंधित महत्वाच्या माहितीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरिण रिजिजू यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, उद्यापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र मंगळवारी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज होणार नाही. कारण त्यादिवशी संविधान सभेने संविधान स्वीकारले, त्याचे 75 वे वर्ष होतील. यापार्श्वभूमीवर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.
संविधान सभागृहात दोन्ही सभागृहातील सदस्य एकत्रित असतील. यादिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सदस्यांना मार्गदर्शन करतील. संविधान दिनी काही महत्वाची कागदपत्रे पुस्तकातून प्रकाशित केली जातील. संविधान निर्मितीआधी काय-काय प्रक्रिया झाली होती, यांसह अनेक गोष्टींची माहिती यामध्ये असेल. हे सामान्य पुस्तक नाही. पुस्तकामध्ये असलेली चित्र, त्याचे वर्णन, मुलभूत संकल्पना, त्याची माहिती देण्यात आली आहे, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2015 पासून देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून सातत्याने संविधान दिन साजरा केला जात आहे. यावर्षीही 75 वर्षे पूर्ण होत असल्याने दिल्लीपासून संपूर्ण देशात हा दिन साजरा केला जाईल. केवळ एका दिवसापुरता कार्यक्रम नसेल. देशभरातील गावागावांत आम्ही संविधान पोहचवणार आहोत, जेणे करून संविधानाची मुलभूत संकल्पना लोकांना माहिती होईल, असे रिजिजू यांनी सांगितले.दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी भाजपला संविधान बदलण्यासाठी 400 हून अधिक खासदार हवे असल्याचा प्रचार केला होता. हा खोटा प्रचार केल्यानेच विरोधकांच्या जागा वाढल्याचा दावा भाजपने केला होता. सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत गेलेल्या मोदींनी संविधानावर माथा टेकवला होता. तसेच पहिल्या अधिवेशनात काँग्रेसवर शरसंधान साधले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.