उत्तर प्रदेश : अंधश्रद्धेच्या नावाखाली लोक डोळे बंद करुन काय करतील आणि काय नाही याचा भरवसा नाही. असाच काहीसा प्रकार मथुरेच्या वृंदावनातील बांके बिहारी मंदिरात घडलाय. येथे येणारे भाविक श्रीकृष्णाचं चरणामृत समजून एसीचं पाणी पितात. भाविकांना या गोष्टीचा थांगपत्ता देखील नाही, परंतु एका व्लॉगरने या गोष्टीमागील सत्य समोर आणलंय. हा नेमका प्रकार काय? समजून घेऊया.
श्रीकृष्णाचं चरणामृत समजून लोक पितात एसीचं पाणी
वृंदावनातील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्ण भक्तांची रीघ लागलेली दिसते. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर हत्तीच्या मुखाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे, ज्यातून सतत पाणी येतं. मंदिरात येणार भाविक हत्तीच्या मुखातून येत असलेलं पाणी श्रीकृष्णाचं चरणामृत समजून पितात. मात्र ते पाणी मंदिर परिसरात लावलेल्या एसीचं आहे, हा खुलासा स्टाग्रामवरील व्लॉगर यायिन शुक्ला याने केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
हत्तीच्या मुखातून येणारं पाणी न पिण्याचं आवाहन
हत्तीच्या मुखातील पाणी पिण्यासाठी मंदिराभोवती भाविकांची गर्दी असते. हे पाणी नेमकं कसलं आहे याची कल्पना कोणालाच नाही. त्यामुळे संबंधित व्लॉगरने हे पाणी पिऊ नये, असं आवाहन भाविकांना केलं आहे. एसीतून निघणारं पाणी हे घातक असतं, त्यात केमिकल्स असतात. या पाण्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं, त्यामुळे हत्तीच्या मुखातून निघणारं पाणी पिणं बंद करावं, असं आवाहन व्लॉगरने केलं आहे.
लोक चक्क ग्लासमध्ये भरुन नेतात हे पाणी
वृंदावनातील बांके बिहारी मंदिरात येणारे भाविक हत्तीच्या मुखातून निघणारं पाणी घेण्यासाठी ग्लास घेऊन येतात. हजारो भाविक हे पाणी पितात, तर काहीजण पाणी घरी नेऊन ते देव्हाऱ्यात ठेवतात. परंतु हे पाणी नेमकं कुठून येत, यामागील सत्य काय? हा विचार कोणीच केला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.