विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. आठवड्याभरात म्हणजेच 18 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील. पण प्रचाराच्या काळात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
कधीकाळी एकमेकांसाठी प्रचार करणारी नेतेमंडळी आता मात्र एकमेकांच्याविरोधात उभी राहिली आहे. असेच दोन नेते आहेत, ते म्हणजे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील एका ठिकाणी प्रचारसभा पार पडली. या ठिकाणी भाषण करत त्यांनी पाटलांवर निशाणा साधला. ज्यानंतर आता जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
इस्लामपूर विधानसभेतील प्रचारसभेत भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, "जयंत पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात एक पोलीस ठाणेही बांधता आले नाही." त्यांच्या या टीकेला आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "माझ्या मतदारसंघातील पोलीस ठाणे अतिशय चांगल्या इमारतीत आहे. ती इमारत फार चांगली आहे. माझ्या मतदारसंघात गुन्हेगारी कमी झाली आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. ते पालकमंत्री असताना पुण्यात किती गुन्हे झाले. त्यांनी अगोदर कोयता गँगचा बंदोबस्त करावा नंतर त्यांनी माझ्यावर बोलावे," असा टोलाच पाटलांनी लगावला आहे. तर, "मला पाडणे एवढे सोपे नाही. मी आणखी बारामतीमध्ये गेलेलो नाही," असे म्हणत पाटलांनी बारामती सभेबाबत टोला लगावला आहे. ज्याप्रमाणे अजित पवारांनी जयंत पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली, त्याचप्रमाणे जयंत पाटील हे सुद्धा अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात जाऊन सभा घेणार का?, याविषयीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.