मुंबई: राज्य परिवहन (आरटीओ) विभागाने वाहनासाठी आवडीचा क्रमांक (चॉइस नंबर) निवडण्याची सुविधा आता ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण राज्यात सोमवार, २५ नोव्हेंबरपासून ही सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन वाहनांसाठी चॉइस नंबरचे
आरक्षण तसेच पैसे भरण्यासाठी आता वाहन खरेदी करणाऱ्यास उपप्रादेशिक परिवहन
कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. या सुविधेची चाचणी आरटीओने
पिंपरी-चिंचवड येथे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
आपल्या वाहनाच्या प्लेटवरील नंबर लक्ष वेधून घेणारा असावा, अशी अनेकांची अपेक्षा असते. आपल्या आवडीचा नंबर मिळविण्यासाठी त्याची संकेतस्थळावर पडताळणी करून त्याचे आरक्षण आणि पैसे भरण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. आता ही सेवा पूर्णपणे फेसलेस करण्यात आली आहे. आवडीचा क्रमांक मिळविण्यासाठी 'फॅन्सी परिवहन' या संकेतस्थळावर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून आपल्या आवडीचा क्रमांक आरक्षित करणे, तसेच त्याचे शुल्कही ऑनलाइन भरता येणार आहे. मात्र, विशिष्ट क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्याची लिलाव प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन होणार आहे. त्या क्रमांकासाठी अधिकचे पैसे मोजणाऱ्याला त्या क्रमांकाची ऑफलाइन पावती देण्यात येईल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिजोरीत १२ कोटींचा महसूल
आरटीओने सप्टेंबरमध्ये चॉइस क्रमांकाच्या शुल्कात सुमारे दुपटीने वाढ केली होती. '०००१' या क्रमांकासाठी मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये सहा लाख रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये मुंबईतील आरटीओ कार्यालयांमध्ये सहा हजारांपेक्षा अधिक चॉइस क्रमांकाची विक्री झाली असून, त्याच्या माध्यमातून आरटीओला १२ कोटींपेक्षा अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे.
...असा निवडा चॉइस क्रमांक
फॅन्सी परिवहन संकेतस्थळावर जाऊन मोबाइल आणि ई-मेलच्या मदतीने ओटीपी मिळवून रजिस्ट्रेशन करा.उपलब्ध असलेल्या चॉइस क्रमांकामधून आवडीचा क्रमांक निश्चित करा.त्याचे पैसे ऑनलाइन पेमेंट गेट-वेच्या मदतीने भरा.ई-पावतीची प्रिंट काढून वाहन विक्रेत्याकडे सादर करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.