सांगली : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याची सोमवारी अखेरची मुदत होती. त्यावेळी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती या कॅंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्यानंतर मोठी खळबळ उडाली. याचवेळी सांगली जिल्ह्यातील मिरज मतदारसंघ कॅंग्रेसचा बालेकिल्ला असताना तो ठाकरे गटाला का सोडला हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. शिवाय पडद्यामागे अशा काय घडामोडी घडल्या ज्यामुळे कॅंग्रेसने मिरजेत भाजपला सरळ सरळ बाय का दिला असा प्रश्न कॅंग्रेस समर्थक उपस्थित करत आहेत. मिरजेत कॅंग्रेसच्या उमेदवारीसाठी नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
मिरज मतदारसंघात सुरुवातीला मोहन वनखंडे यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन जिल्ह्यातील कॅंग्रेस नेत्यांनी दिले होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात आला. त्यानंतरही वनखंडे यांना जिल्ह्यातील नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. मात्र ऐनवेळी त्यांना एबी फार्म देण्यात आला नाही. त्यामुळे वनखंडे यांनी माघार घेतली. त्यानंतर कॅंग्रेसकडून इच्छुक असणारे उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांनीही कॅंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्यांनाही उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील कॅंग्रेसच्या नेत्यांनीच वनखंडे आणि माझा केसाने गळा कापला असा आरोप केला आहे.
मिरज मतदारसंघ कॅंग्रेसचा बालेकिल्ला असतानाही जिल्ह्यातील नेत्यांनी हा मतदारसंघ पक्षाला मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत का असा प्रश्न मिरजेतील कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. पक्षाच्या या घातक निर्णयामुळे पक्षाचे अपरिमित नुकसान झाल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. शिवाय भाजपला मिरज मतदारसंघात बाय देण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी नेमकी कोणती डील केली आहे अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. एकंदरीत कॅंग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या बोटचेपेपणामुळेच एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.