नांदेड : 'लीव्ह इट, लीव्ह इट…' उनको अब छोड दो… उनके बारे में कुछ बोलना नही… अशा सुस्पष्ट शब्दांत काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पक्षाचे नांदेडस्थित माजी नेते अशोक चव्हाण यांच्याबाबतचा अभिप्राय दिला आणि गुरुवारी येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी शंकररावांचा साधा उल्लेखही केला नाही आणि धाकट्या चव्हाणांना तर बेदखल केेले !
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या त्या निर्णयाचे गांधी परिवाराला आश्चर्य वाटले होते. नंतरच्या काळात काँग्रेस पक्षाध्यक्षांपासून प्रदेश पातळीवरील नेत्यांपर्यंत अनेकांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. पण त्यावेळी शांत राहिलेल्या चव्हाण यांनी सध्याच्या निवडणुकीदरम्यान मौन सोडत, पक्षाकडून त्रास देण्यात आल्यामुळे आपण भाजपात गेल्याचे जाहीरपणे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये येऊन गेलेल्या सचिन पायलट, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अमित देशमुख इत्यादी नेत्यांनी अशोक चव्हाण यांचा ठिकठिकाणी समाचार घेतला. त्यानंतर खा.गांधी यांनीही चव्हाण यांचा येथील सभेमध्ये 'समाचार' घ्यावा, यादृष्टीने काँग्रेसच्या एका जाणत्या पदाधिकाऱ्याने राहुल यांच्यासाठी काही मुद्दे कागदावर उतरविले होते.
असे सांगण्यात आले की, अशोक चव्हाणांचा पंचनामा करणारे काही मुद्दे तयार ठेवा, अशी सूचना .गांधी यांच्या यंत्रणेकडून येथे आली होती. त्यानंतर चव्हाण यांच्या चमूत दीर्घकाळ राहिलेल्या स्थानिक पदाधिकार्याने काही मुद्यांची भट्टी जमविली होती, पण राहुल यांनी चव्हाण यांना बेदखल करायचे, हे ठरवूनच सभास्थान गाठले.
खासदार अशोक चव्हाण आणि त्यांच्या उमेदवार कन्येने भोकरमधील प्रचारात काँग्रेसचे नेते दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा जप चालवला आहे. पण त्यांच्या पश्चात अशोकरावांनी पक्षाशी कृतघ्नपणा केल्याची काँग्रेस नेत्यांची भावना झाली आहे. असे असले, तरी नांदेडमध्ये आलेल्या राहुल गांधी यांनी चव्हाण परिवाराचा उल्लेख टाळूनच आपले भाषण केले.गांधी परिवारातील सर्व सदस्यांच्या नांदेडमधील आजवरच्या जाहीर सभा चव्हाण परिवाराच्या नियंत्रणाखाली पार पडल्या. मागील २० वर्षांत अशोक चव्हाणच सर्व नियोजनाचा सूत्रधार होते, पण त्यांच्या पक्षत्यागानंतर नवख्या पदाधिकाऱ्यांनी राहुल यांचा दौरा सुनियोजितपणे यशस्वी केला. सभा झाल्यानंतर नांदेड बसस्थानकावर जाऊन राहुल गांधी यांनी सामान्यांशी साधलेला संवाद अत्यंत लक्षवेधी ठरला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.