भारत आणि इस्रायलच्या विरोधात नव्याने जिहादी मोहीम सुरू करावी आणि जगात इस्लामचे राज्य प्रस्थापित करावे, असे आवाहनही त्याने केले. भाषणातून तो अधूनमधून सारखे 'भारत, तेरी मौत आ रही हैं' असे बरळत राहिलेला आहे. मसूदचे हे भाषण ताजे आहे, हे गाझाबद्दलच्या उल्लेखावरून अगदी स्पष्ट आहे.
संसद, उरी, पुलवामा, पठाणकोट दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड
मौलाना मसूद अझर हा भारतीय संसदेवरील हल्ला, पठाणकोट, पुलवामा, उरी हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आहे. जैश-ए- मोहम्मदच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याचे हे ताजे भाषण अपलोड झाले आहे.भाषणाचे औचित्य काय?
1924 मध्ये तुर्कीतील खिलाफत (केंद्रीय इस्लामी राजवट) संपुष्टात येण्यास 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खंत व्यक्त करणारे व खिलाफत पूर्ववत सुरू व्हावी म्हणून दहशतवाद्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मसूदचे हे भाषण होते.
मसूद : काश्मीर, अटक, विमान अपहरण, सुटका, पुन्हा दहशतवाद
* 1968 मध्ये जन्मलेला मसूद मूळचा बहावलपूर पाकिस्तानचाच आहे. तो पहिल्यांदा ढाक्याहून व्हाया दिल्ली, श्रीनगरात आला होता. काश्मीर भारतापासून वेगळा करणे, हे त्याचे ध्येय होते.
* 1994 मध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अनंतनाग येथे त्याला अटक केली होती.
* 1999 मध्ये मसूदच्या भावासह इतर दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचे अपहरण केले. प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारने मसूदची सुटका केली * 2019 मध्ये मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले.
कुठे केले भाषण?
बहावलपुरलगत 1 हजार एकरावरील उम्म-उल-कुरा मदरशात त्याचे हे भाषण झाल्याचे भारतीय गुप्तचर विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
'ते' ठिकाण पाकच्या नव्हे, दहशतवाद्यांच्याच ताब्यात
2019 मध्ये : मसूदने हे भाषण केले त्या बहावलपुरलगतच्या या भागावर पूर्ववत कब्जा केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता खरा; परंतु अजूनही हे ठिकाण दहशताद्यांच्याच ताब्यात आहे.
2022 मध्ये : पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी मसूद अझर अफगाणिस्तानात पळून गेल्याचे सांगितले होते. तेही खोटे ठरले आहे.
पाकचे पीतळ उघड : भारत
मसूद पाकिस्तानात नाही, असे पाकिस्तान वारंवार सांगत आला आहे. पाकचे पितळ या भाषणाने उघडे पडले आहे, अशी प्रतिक्रिया यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी दिली. मसूदविरुद्ध पाकने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.