इंदापुरातलं ते भयानक दृश्य. संकटापुढे हरलेली तीन लेकरांची आई दारू प्यायला लागली.. मुलांना पुढे करून भीक मागायला लावली..!
गेल्या तीन-चार दिवसात किंवा आठवडाभर इंदापुरात एक माता आपल्या तीन अभागी लेकरांसोबत फिरताना दिसत होती.. एक मुलगी आणि दोन मुलं.. साधारण वय दोन, तीन आणि चार वर्ष! ही गोड गोजिरी सुंदर मुलं.. या मुलांना पुढे घालून ही साधारण 35 वर्ष वयाची ही माऊली इंदापुरात सर्वत्र भिक मागायची.. इथपर्यंत सगळं ठीक होतं.. नॉर्मल होतं.. (पण आयुष्यात बसलेले चटके म्हणा किंवा आलेले वाईट अनुभव म्हणा, कारण प्रत्येकाचं दुःख ज्याचं त्यालाच माहीत असतं.. पण दुःखाची दोन हात करून संकटाशी सामना करून आलेल्या प्रसंगाला तोंड देत जो पुढे जातो तो सिकंदर म्हणतात आणि संकटाला घाबरून माणूस ज्यावेळेस व्यसनाधीन होतो त्यावेळेस त्याचा संघर्ष अस्तित्व आणि सन्मान संपलेला असतो.)
मातृदेवो भव म्हणतात, पण ही माता मात्र कदाचित संकटासमोर, संघर्षासमोर हारली आणि जे नको होतं तेच घडलं. दारूच्या नशेची तिला चटक लागली. दारूच्या नशेत नको त्या अवस्थेत नको तिथे ती पडलेली असायची. आपल्या लेकरांची, त्यांच्या भुकेची तिला काही जाणीव नसायची.. यांनी काही खाल्ले का? ही फुटपाथवर आहेत का रस्त्यावर आहेत? यांना कोणी उचलून घेऊन जाऊ शकत, वाईट काहीतरी या लेकरांबरोबर होऊ शकतं.. ट्रॅफिक आहे.. गाड्या वाहतात.. अवजड वाहने आहेत.. लेकरांच्या जीवितास धोका आहे.. याची पर्वाही नव्हती.. तमाही नव्हती..
अति प्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे तिला कशाचीच शुद्ध नसायची.. याचमुळे पाहणारा प्रत्येक व्यक्ती तिच्या मातृत्वाला दोष द्यायचा आणि या अभागी लेकरांसाठी दुवा बोलायचा.. परवा संध्याकाळी आशिष मखरे चां मला फोन आला..दादा, इंदापूर बस स्टँडसमोर एक महिला आणि तिची तीन लेकरं हायवे जवळ फूटपाथवर बसलीयत.. लवकर या!
मी बाहेरगावी असल्याने आणि 1 तास लागेल म्हणाल्यावर त्याने एक vdo पाठवला. घटनेचं गांभीर्य ओळखून त्याला काही सूचना करत मी नेहमी अशा बाबतीत संवेदनशीलता दाखवणाऱ्या सहकारी माताभगिनींना फोन लावले आणि मी पोहचेपर्यंत तिथ जायची विनंती केली. नेमक्या दोघी- तिघी बिझी होत्या.. आमचे शेजारी राहणारे मिलिंद सरतापेमामा यांनी त्यांच्या घरून अंथरायला पोती, पांघरायला ब्लँकेट आणि मुलांना खाऊ घेऊन त्या ठिकाणी पोहचले..
आशिषला विनंती करून ती मुलं रस्त्यावर जाणार नाहीत, कोणी उचलून नेणार नाही, याकडे लक्ष द्यायला सांगितलं. 50 km दूर वरून कधी इंदापूर ल पोहचेल अस त्या लेकरांचा गोड निष्पाप चेहरा बघून वाटत होतं. आमच्या हक्काच्या ताई, राजमाता ग्रुपच्या मयुरा पाटील, पवार वहिनी मात्र एव्हाना तिथे पोहचल्या होत्या. माझं निम्मं टेन्शन कमी झालं होत.त्या लेकरांची आई मात्र दारूच्या नशेत धुंद होऊन रस्त्यावर झोपली होती आणि इंदापूरकरांच्या संवेदनशीलतेच्या आणि माणुसकीच्या छत्रछायेची सावली मात्र हळूहळू त्या लेकरांभोवती एकवटत होती. चाईल्ड हेल्पलाईन, सखी हेल्प सेंटर, अनाथाश्रम, महिला दक्षता समिती, ऍडव्होकेट सल्लागार, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, महिला पोलिस या सर्वांशी फोनवर सवांद साधत त्या महिलेच्या नातेवाईकांचा तपास घेत घटनेचं गांभीर्य समजत समजावत मी इंदापूर कडे प्रवास करत होतो.
आशिष मखरे, सरतापे मामा, मयुराताई फोन करून मला परिस्थिती सांगत होत्या. लवकर या म्हणत होत्या..15 km..10km.. 5km .. असा प्रवास करत तिथे पोहोचलो.. सायरा भाभी ही एव्हाना तिथं पोहचल्या होत्या.. इंदापूर बस स्टँड समोर मोठी गर्दी जमली होती. या महिला त्या दारू पिवून झोपलेल्या मातेला शुध्दीवर आणायचा प्रयत्न करत होत्या..
80 /90 किलो ची ती धिप्पाड माय खूपच भयानक दिसत होती. जवळ जाताच दारूचा उग्र वास येत होता.. मी तिथं पोहचताच सहकारी महिलांना सांगून रमेश टुले यांच्या अँब्युलन्स मधे त्या महिलेला आणि संतोषच्या ऑटो रिक्षात त्या बाळांना बसवून पोलिस स्टेशनला न्यायला लावले.
Child help line चा संपर्क चालूच होता. पुण्याच्या सखी सेंटरच्या भोर मॅडम यांनी खूप सहकार्य, मार्गदर्शन केलं!
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोकणे साहेब, सहायक निरीक्षक स्मिता पाटील हे दोन्ही ही नवीन अधिकारी असल्यामुळे सुरवातीला त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नव्हता, पण आमच्या महिला दक्षता समितीच्या सायरा आत्तार, मयुरा पाटील आणि महिलांनी खूप स्पष्टपणे आमचा सामाजिक उद्देश आणि त्या लेकरांच्या प्रती आसलेल्या भावना स्पष्ट केल्या. आपल्या फोन कॉन्टॅक्टचा छान वापर करून सरतेशेवटी रात्री 11 वाजता पोलिस स्टेशनच्या वतीने महिला पोलिस लडकत मॅडम, शेख साहेब आणि स्वतः सायराभाभी यांनी पोलिस स्टेशनचे पत्र घेवून पुणे येथे कोर्टाच्या आदेशाने बालसंस्कार केंद्रात त्या मुलाना पहाटे 2/3 वा दाखल केलेआपल्या दारूच्या व्यसनासाठी, पोटासाठी त्या तीन लहान लेकरांना हाणून मारून भिक मागायला लावणारी ती आधुनिक पुतणामायला दारूच्या नशेत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून मी घरी निवांत सुख समाधानाने झोपलो होती. आजची रात्र शांत आणि समाधानाची झोप येणार होती. कारण उद्या पासून त्या तीन निष्पाप निरागस लेकरांचं आयुष्य बदलणार होतं..
बीजे अंकुरे अंकुरे…ओल्या मातीच्या कुशीत! कसं रुजाव बियाणं? माळरानी खडकात?
खरच ज्यांनी ज्यांनी या लेकरांसाठी सहकार्य केलं, त्या प्रामुख्यानं नाव घ्यावं अशा इंदापूर police station चे लडकत मॅडम, महिला दक्षता समितीच्या सायराभाभी अत्तार, सौ मयूरा पाटील आशिष मखरे, शेख पोलिस, मिलिंद सरतापे मामा, API स्मिता पाटील, पी आय कोकणे साहेब, पुण्याच्या भोर मॅडम, रमेश टुले, संतोष आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार! इंदापूर police station ला विनंती की, त्या महिलेलाही महिला सुधार गृहात रवाना करावे! एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर मेणबत्त्या पेटवून, रस्त्यावर उतरून, सिस्टीमला दोष देण्यापेक्षा या सिस्टीमला लढा देऊन, हलवून जागं करून, ती घटना घडू नये म्हणून नागरिकांनी जागृत राहीलं तर खूप अनर्थ टळतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.