Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच, निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना डिवचले, म्हणाले...

नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच, निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना डिवचले, म्हणाले...
 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे विजयी झाले होते. त्यानंतर आज झालेल्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी राणे कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत डिवचले आहे.

 

उद्धव ठाकरे यांना उद्देशून सोशल मीडियावर लिहिलेल्या पत्रात निलेश राणे म्हणाले की, "तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

या पत्रात निलेश राणे पुढे लिहितात की, उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा. आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो, कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमचं अजून कठीण होईल, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला. निलेश राणे यांनी या विधानसभा निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून लढताना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा आठ हजार मतांनी पराभव केला होता.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.