सामाजिक समतेचे प्रणेते डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला अन् जणू काही सामाजिक समतेचा क्रांतीसुर्य उदयास आला.कारण त्यांचा उदय हा गोरगरीब,निराधार,उपेक्षित अशा दलित-पददलित समाजाच्या जीवनातील अस्पृश्यतेचा अंधार नाहिसा करणारा तेजस्वी प्रकाशच ठरला.बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार हे लष्करात नोकरीला होते,तर आई भीमाबाई यांचे भीमराव अवघ्या पाच वर्षांचे असतानाच दुःखद निधन झाले.त्यामुळे बाबासाहेबांच्या मातेची छत्रछाया बालवयातच विरून गेली.अखेर वडील रामजी सुभेदार यांनी मोठ्या धैर्याने आई-वडिलांची दुहेरी भूमिका बजावून भीमरावांना लहानाचं मोठं केलं.त्यासह त्यांना शिकवून समाजात ताट मानेनं उभं करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं.अशा थोर रामजी सुभेदार अन् वंदनीय भीमाबाई यांनाही याप्रसंगी आम्हा सर्वांचे त्रिवार वंदन!
खरं तर,शिक्षण पूर्ण करून रूढीप्रिय समाजातील जातीभेद-वर्णभेद समूळ नष्ट करणे,हेच त्यांचे मुळ उद्दिष्ट होते.या पार्श्वभूमीवरच बाबासाहेबांनी मागास समाजाला शिका,संघटित व्हा अन् संघर्ष करा हा मंत्र दिला.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी आयुध असून,त्याद्वारे आपल्याला घटनादत्त अधिकारांची अन् समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव होते.तसेच शिक्षण घेतल्यावर ती व्यक्ती विवेकी व विचारी होते,असा संदेश त्यांनी मागास समाजाला दिला.यास्तव शिकाल तर टिकाल हेही त्यांनी मागास समाजाच्या सदस्यांना आवर्जून सांगितल्याने ते शिक्षण घेण्यास आवडीने पुढे आले.
इतकेच नव्हे तर,बाबासाहेबांनी स्त्री शिक्षणावर अधिक भर दिला.स्त्रिया शिकल्या तर,त्या आपल्या मुला-मुलींवर चांगले संस्कार घडवू शकतात अन् पुढे समाजाचा सर्वागीण विकास घडविण्यात भरीव योगदान देऊ शकतात.यास्तव सर्वात आधी त्यांना चूल अन् मूल या चौकटीतून बाहेर काढायला हवे,हा मोलाचा विचार त्यांनी आपल्या बांधवांना दिला.शिक्षणामुळे माणसात न्यायाची चाड अन् अन्यायाची चिड निर्माण होते,हे प्रत्येकाने ध्यानी ठेवावे,असा उपदेश त्यांनी उपेक्षित घटकांना दिला.त्यामुळे मागासवर्गियांमध्ये शिक्षणाची मोठी गोडी निर्माण होऊन ते शिकूनसवरून पुढे येऊ लागले आहेत.त्यांना आपल्या घटनादत्त अधिकारांची जाणीव होऊ लागली.वास्तवात हेच खरे बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीचे फलित आहे.अत: वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण अभिवादन!
दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १९०८ साली रमाबाई धुत्रे (वलंगकर)यांच्याशी विवाह झाला.रमाबाई ह्या सामाजिक चळवळीत आयुष्यभर बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.सामाजिक तथा आर्थिक समस्यांना त्यांनी मोठ्या धैर्याने मात करून त्या जीवनभर बाबासाहेबांची सावली बनून राहिल्या.त्यामुळे बाबासाहेबांना आपली सामाजिक समतेची लढाई जिंकण्यास पाठबळ मिळालं.अशा महान मातेचं २७ मे १९३५ रोजी दादर येथे दुःखद निधन झालं.यशवंत भीमराव आंबेडकर हा त्यांचा सुपुत्र तर,प्रकाश आंबेडकर अन् आनंदराज आंबेडकर हे त्यांचे नातू.काळ लोटत गेला.दरम्यान सन १९४८ मध्ये बाबासाहेबांचा डॉ.सविता कबीर यांच्याशी दुसरा विवाह झाला.त्यांनीही आंबेडकरांना सामाजिक जीवनात मोलाची साथ दिली.कहते है ना,हर कामियाब इंसान के पिछे औरत का हाथ होता है शैक्षणिक जीवनाची वाटचाल करताना बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर बाबासाहेब हे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले.त्यांना कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी मोलाची मदत केली. एम.ए.,पी.एच.डी., एम.एससी.,डी.एससी., एल.एल.डी.,डी.लिट., बॅरिस्टर आदी तत्सम पदव्या बाबासाहेबांनी सखोल अध्ययन करून देश-विदेशातून संपादन केल्या.दलित-पददलित,अन्य मागासवर्गीयांना शिक्षणाची कवाडं उघडावी,या प्रांजळ उद्देशाने त्यांनी सन १९४५ मध्ये मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटीची तर,सन १९४६ मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्कॉलरशिपची व्यवस्था केली.बाबासाहेब हे काही काळ मुंबईच्या सिडमहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.त्यानंतर बाबासाहेबांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहिले. समाजातील गोरगरीब,गरजू,उपेक्षित घटकांना शिक्षण घेणे शक्य व्हावे,यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणलेत.इतकेच नव्हे तर,बाबासाहेबांनी आपल्या दादर येथील राजगृहात मागास विद्यार्थ्यांसाठी अभ्यासयुक्त अशी ५० हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध करून दिली.वास्तवात बाबासाहेब हे मागासवर्गियांचे कैवारी होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सनदशीर मार्गाने चालावा,यासाठी भारतीय राज्यघटना तयार करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सोपविण्यात आले.घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करत,त्यात काही सदस्यांचा समावेश केला.बाबासाहेबांनी मसुदा समितीच्या सदस्यांसोबत विविध देशांचे दौरे करून तब्बल २ वर्षे ११ महिने १८ दिवस काम केलं अन् घटनेला अंतिम रूप दिलं.त्यानंतर बाबासाहेबांनी सदर घटनेचा मसुदा डॉ.राजेंद्र प्रसाद यांना अंतिम मंजुरीसाठी पाठविला. त्याला २६ नोव्हेंबर,१९४९ रोजी मान्यता मिळाली अन् लगेच आपल्या देशाचा राज्यकारभार २६ जानेवारी १९५० पासून सनदशीर मार्गाने सुरू झाला.त्यात ४१३ कलमे अन् १२ परिशिष्टांचा समावेश करण्यात आला आहे.ही राज्यघटना म्हणजे बाबासाहेबांनी देशाला दिलेला एक सुंदर उपहार आहे.त्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,पंतप्रधान व त्यांचे केंद्रीय मंत्री,सुप्रीम व हायकोर्टाचे न्यायाधीशांचे अधिकार व कर्तव्य,राज्यपाल,राज्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अधिकार व कर्तव्य,राष्ट्रीय निवडणूक आयोग,राष्ट्रीय माहिती अधिकार आयोग,स्थानिक स्वराज्य संस्था आदी शासकीय संस्थांचे अधिकार व कर्तव्य यासंबंधीचे कायदे त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,उद्योग-नोकरी करण्याचे स्वातंत्र्य,जीवन जगण्याचे स्वातंत्र्य,धार्मिक स्वातंत्र्य,शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य,न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार बहाल केले.मूलभूत अधिकारांचा उपभोग घेताना,इतरांच्या अधिकारांची पायमल्ली होणार नाही,याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी,याचीही आठवण त्यांनी घटनेत करून दिली आहे.जातपात,धर्म,पंत गरीब-श्रीमंत,स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता,सर्वांना कायद्यापुढे त्यांनी समान लेखले.उल्लेखनीय बाब म्हणजे देशात अस्पृश्यता निर्मूलन होऊन जात,धर्म,पंथ असा भेदाभेद करणे कायद्याने गुन्हा आहे,असेही त्यांनी घटनेत अधोरेखित केले.घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सर्वसमावेशक अशा राज्यघटनेमुळे देशात सामाजिक समता प्रस्थापित होऊन कायद्यापुढे सर्व नागरिक समान मानले जाऊ लागले,हेच खरे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचे फलित आहे.याशिवाय संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार करून १८ वर्षांवरील सर्वधर्मीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल करत,त्यांना आपल्या पसंतीचा लोकप्रतिनिधी लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाठविण्याचा अधिकार बहाल केला.भारत देश हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून नावरूपाला येऊन हिंदुस्थानात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.
बाबासाहेब म्हणत,गौतम बुद्ध अन् महात्मा ज्योतिबा फुले हे माझे गुरू तर,विद्या-विनय-शील ही माझी दैवतं आहेत. शतकानुशतके गुलामगिरीचं मुकं जीवन जगणाऱ्या उपेक्षित समाजाची अस्मिता जागृत करून त्यांना बोलकं करण्यासाठी बाबासाहेबांनी मुकनायक,बहिष्कृत भारत,जनता,प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सुरू केली.केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता पत्रकारांनी समाज परिवर्तनासाठी वस्तुनिष्ठ बातम्या छापाव्यात,असा मोलाचा सल्ला त्यांनी वृत्तपत्रांच्या मालकांना-संपादकांना दिला. लोकशिक्षण अन् जनजागृती ह्या दोन मापदंडांचे पत्रकारांनी तंतोतंत पालन करावे,जेणेकरून पत्रकारिता क्षेत्राचे महत्व व उपयुक्तता समाजात कायमस्वरुपी अबाधित राहील,हा विचार त्यांनी वृत्तपत्रांसमोर मांडला. बाबासाहेब हे महान लेखक,साहित्यकार,संपादक,पत्रकार होते,हे सिद्धीस येते.
उल्लेखनीय बाब म्हणजे स्त्री-पुरुषात भेदाभेद निर्माण करणारी मनुस्मृती ची त्यांनी जाहीररित्या होळी केली.त्याप्रमाणेच महाडचा चवदार तलाव लोकचळवळ उभारून दलितांसाठी खुला केला.तसेच नाशिकचे काळाराम मंदीर,अमरावतीचे अंबादेवी मंदीर व पुण्याचे पार्वती मंदीर येथे दलितांना प्रवेश देण्यासाठी बाबासाहेबांनी तीव्र जनआंदोलन उभारले अन् अखेर आंबेडकरांना त्यात यश मिळून या मंदिरांमध्ये पददलितांसाठी प्रवेश खुला झाला.या सर्व घटनांमुळे बाबासाहेबांचे मन उद्विग्न झाले.देशात पसरलेल्या जातीभेद, वर्णभेदच्या विषवल्लीमुळे त्यांना अतीव दुःख झालं.त्याची परिणती म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हिंदूधर्म त्यागून बौद्धधर्माची दीक्षा घेतली.देशभरातील दुर्लक्षित-उपेक्षित घटकांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कर्तव्य तनमनधनाने बजावून,अखेर ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेतला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून देशात सामाजिक समता प्रस्थापित करून अस्पृश्यतेचे निर्मूलन केलं.वास्तविक पहाता,हीच खरी त्यांच्या मानवतावादी जीवनाची ओळख आहे.वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वधर्मीयांकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान सामाजिक योगदानाला त्रिवार वंदन करून पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून २६ नोव्हेंबर हा दिवस साऱ्या देशात संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.याशिवाय इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जात आहे.वास्तविक पहाता,हीच खरी घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना आहे.
जय भीम! जय हिंद! जय महाराष्ट्र!
- पत्रकार रणवीर राजपूत (९९२०६७४२१९)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.