सांगली शहरानजिक कवलापूर विमानतळ होण्यासाठी केंद्रीय मंत्री राम नायडू यांना साकडे घातले होते. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एक महिन्यात कवलापूर येथील विमानतळाच्या जागेचा सर्व्ह करण्यासाठी केंद्रीय समिती कवलापुरला येणार आहे. त्यानंतर ते राज्य शासनाला अहवाल देतील. राज्य शासनाच्या अधिकार्यांकडे देखील आम्ही पाठपुरावा करू. सध्या ही जागा १६० एकर असून एमआयडीसीने सर्व अतिक्रमण काढून घेतले आहेत. धावपट्टी ११०० मीटर आहे. नोटीसा दिलेल्या शेतकर्यांची जागा संपादन केल्यास १६०० मीटरची धावपट्टी होणार आहे. पण मोठी विमाने उड्डाण करण्यासाठी १९८० मीटर ते अडीच किलोमिटरची धावपट्टी लागते. केंद्रीय अधिकार्यांनी जागेची पाहणी करून याबाबतचा अहवाल देणार आहे. त्यामुळे कवलापुरच्या विमानतळाबाबत सकारात्मक निर्णय होईल असे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले.सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनेच्या विस्तारीत प्रकल्पाला जल आयोगाची मान्यता घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून खासदार पाटील म्हणाले,हा प्रकल्प सुमारे ३५०० कोटींचा आहे. मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाला निधी मिळण्यास मदत होईल. पूर्वीच्या योजनेला जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर ‘एआयबीपी’ने एक हजार कोटींचा निधी दिला होता. शक्तिपीठ महामार्गाबाबत जिल्ह्यात शेतकर्यांच्या समिश्र भावना आहेत. दुष्काळी भागातील शेतकर्यांनी महामार्ग व्हावा, अशी मागणी केली आहे. तर इतर ठिकाणी महामार्गाला विरोध आहे. त्या शेतकर्यांबरोबर शासनाने चर्चा करावी. भूसंपादनासाठी जास्तीत जास्त मोबदला शेतकर्यांना द्यावा. जादा नुकसान शेतकर्यांचे करू नये व बळजबरीने देखील महामार्ग करू नये, अशी आपली भूमिका आहे.
सांगली-कोल्हापूर रस्त्यासाठी १२०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. सांगलीत भूसंपादनाची तक्रार नाही. कोल्हापूरचा वाद दोन्ही खासदारांनी मिटवावा व रस्ता तातडीने होण्यासाठी प्रयत्न करावेत.अशी मागणी ही त्यांनी केली.मायणी--विटा आणि तासगांव--म्हैशाळ रस्त्यासाठी १२००कोटी मंजूर झाले असून लवकरच भूसंपादन होणार आहे. या शिवाय सांगली शिवशंभो चौक ते कडेगाव या रस्ता रूंदीकरण करावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. शिवाय कराड-पलूस-पाचवामैल-तासगाव-मणेराजुरी-शिरढोण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पण या रस्त्यावरील पुलाची कामे अपूर्ण आहेत. त्यासाठी देखील निधी मंजूर झाला असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले.
अमित शहांचे वक्तव्य दुर्दैवी
संविधान बदलण्याचा घाट भाजपने आखल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांना जनतेने चपराक दिली होती. आता संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. लोकसभा संविधानाचे मंदिर आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे उचित आहे. पण त्यांनी चुकीचे वक्तव्य केले. या प्रकरणी अमित शहांनी माफी मागावी, राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. पण त्यांनी ऐकले नाही. ‘मनुस्मृर्ती’ची ही दादागिरी सुरू असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला.
कौटुंबिक अडचण असल्याने जयश्रीताईंचा प्रचार...
सांगली विधानसभेच्या निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांनी उभे राहू नये, अशी विनंती त्यांना वारंवार मी केली होती. तरी देखील त्या निवडणुकीत उभ्या राहिल्या. त्यांची समजूत काढण्यात मी अपयशी ठरलो. कौटुंबिक अडचण असल्यामुळे त्यांचा पाठीशी राहिलो. पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेली नाराजी स्वाभाविक आहे. त्यांच्या भावना समजू शकतो. पण पुन्हा असे होणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू, असे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.