सांगली : खानापूर तालुक्यातील घानवड येथील माजी उपसरपंचांचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. गुरुवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान गार्डी-नेवरी रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्यासह विटा पोलिसांनी तातडीने धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बापूराव चव्हाण (वय ४६, रा. घानवड) असे मृताचे नाव आहे. चव्हाण यांचे गार्डी हद्दीत पोल्ट्री फार्म आहे. गुरुवारी दुपारी चव्हाण त्यांच्या बुलेटवरून तिकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना संशयितांनी अडवले. ते थांबल्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर दोन वार केले. त्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेले. चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर काहींनी याची माहिती विटा पोलिसांना दिली.खुनाची माहिती मिळाल्यानंतर विटा पोलिसांसह एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे पथकासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला. चव्हाण यांची बुलेट रस्त्याकडेला उभी होती. घटनास्थळावरील परिस्थितीनुसार हल्लेखोर चव्हाण यांच्या ओळखीचे असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. एलसीबीसह विटा पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.