तुमचा सिबिल स्कोअर किती? RBI ने नियमात केले बदल, तुमच्यावर होणार परिणाम
मुंबई : मुलांचं शिक्षण असो, घर बांधणं असो किंवा गाडी खरेदी असो, अशा कितीतरी कारणांसाठी लोनची गरज पडते. बहुतेक नोकरदारदेखील पर्सनल लोन घेऊन आपल्या मोठ्या गरजा पूर्ण करतात. लोन घेताना प्रत्येक व्यक्तीच्या कानावर सिबिल स्कोअर हा शब्द पडतो.
कारण, बहुतेक कर्ज देणारे कर्ज घेणाऱ्याचा सिबिल स्कोअर चेक करतात. कर्जदाराचा सिबिल स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असावा, अशी कर्जदात्यांची अपेक्षा असते. सिबिल स्कोअर बघितल्यानंतर संबंधित व्यक्तीला कर्ज द्यायचं की नाही याचा निर्णय घेतला जातो. आता आरबीआयने सिबिल स्कोअरबाबत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार, सिबिल स्कोअर तपासल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्याची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक आहे.सिबिल स्कोअरशी संबंधित अनेक तक्रारी आरबीआयकडे आल्या होत्या. त्यामुळे आरबीआयने याबाबत आता नियम तयार केले आहेत. या नियमांनुसार, कोणतीही बँक किंवा इतर वित्तीय संस्था एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर तपासत असल्यास, त्या व्यक्तीला ताबडतोब त्याची माहिती दिली पाहिजे. संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेने प्रत्येक ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून सर्व क्रेडिट माहिती देणे बंधनकारक आहे.
अनेकदा असं होतं की, कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेत कर्जासाठी केलेला अर्ज नाकारला जातो. अर्ज नाकारण्यामागील कारण ग्राहकांना सांगितलं जात नाही. अशा प्रकरणांसाठी देखील आरबीआयने नियम केला आहे. जर एखादी बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज नाकारत असेल तर तिने ग्राहकांना कारण सांगणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमाचं पालन न झाल्यास संबंधित बँक किंवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था आणि बँकांनी सर्व ग्राहकांना वर्षातून एकदा विनाशुल्क ऑनलाइन क्रेडिट स्कोअरची माहिती देणे बंधनकारक आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आपल्या क्रेडिट स्कोअरची सद्यस्थिती समजेल. याशिवाय, बँका आणि वित्तीय संस्थांना आदेश देण्यात आला आहे की, क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअरबाबत ग्राहकांची तक्रार असल्यास 30 दिवसांच्या आत तिचं निराकरण करणे गरजेचं आहे. 30 दिवसांत तक्रारीचे निराकरण न झाल्यास बँकेला दंड आकारला जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.