आरवडेत २२ मुलांना विषबाधा
मांजडे : आरवडे (ता. तासगाव) येथील शालेय मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. आरवडे, डोर्ली, पुणदीसह परिसरातील २२ मुला-मुलींना विषबाधा झाल्याची लक्षणे आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासन तत्काळ गावामध्ये दाखल झाले. लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. एका मंदिरातील प्रसाद खाल्ल्यानंतर हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
आरवडे येथे २६ जानेवारी रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही प्रसाद शिल्लक राहिला होता. त्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी तो गावातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आला. दुपारी १२ च्या सुट्टीमध्ये हे अन्न शाळेतील मुलानी खाल्ले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पोटात दुखणे, मळमळ, उलट्या, डोके दुखणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली. याबाबतची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. आरोग्य विभागाची यंत्रणा रात्रीच उपचारासाठी गावात दाखल झाली. लक्षणे दिसणाऱ्या मुलांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थ व पालकांनी गर्दी केली होती.मंदिराच्या प्रसादातून विषबाधा झाल्याची चर्चा
गावातील एका मंदिरात रविवारी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिल्लक राहिलेले अन्न व्यवस्थापनाने प्रसाद म्हणून शाळेतील मुलांना दिले. त्या अन्नातूनच विषबाधा झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. दरम्यान, मंदिर व्यवस्थापनाने आपल्या यंत्रणेकडून असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.