संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक हभप शिरीष महाराज मोरे (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी आज राहत्या घरात गळफास घेत स्वत:चा जीव संपवल्याची माहिती समोर आली आहे. शिरीष मोरे यांनी टोकाचं पाऊल का उचललं
यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या घटनेने तीर्थक्षेत्र देहू
गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी
चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आला
आहे.
शिवव्याख्याते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचं लग्न ठरलं आहे आणि टिळासुद्धा झाल्याची माहिती आहे. वारकरी संप्रदायातील तरुण उमदे व अभ्यासू नेतृत्व, कोल्हापूर विभागाचे संघाचे कार्यवाहक आणि शिवव्याख्याते म्हणून देखील शिरीष महाराज अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचललं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
आज पहाटेच्या सुमारास शिरीष महाराज यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची माहिती मिळताच देहू रोड पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले. सध्या शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन सुरू असून संध्याकाळी चार वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ही घटना समस्त देहू करांसाठी व मोरे कुटुंबीयांसाठी धार्मिक अध्यात्मिक आणि कौटुंबिक नुकसान करणारी असून महारांजाचं निधन अकस्मात झालं आहे या संदर्भातली चौकशी पोलीस करतील. मात्र तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता या दुःखात आम्हाला आधार द्यावा असं त्यांच्या कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.