सांगली, दि. 4 : अत्यंत गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या 22 लाभार्थी बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता मुंबई येथील बालाजी हॉस्पिटल, सिध्दिविनायक हॉस्पिटल, एसआरसीसी हॉस्पिटल येथे आज सिव्हील हॉस्पिटल सांगली येथून पाठविण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी बालक व पालक यांना यशस्वी व मोफत शस्त्रक्रियेची ग्वाही दिली.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दि. 10 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीईआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने डीईआयसी इमारत सांगली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाने मोफत 2 डी इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मुंबई येथील करारबध्द बालाजी हॉस्पिटल या रुग्णालयातील तपासणी पथक उपस्थित होते. या शिबीरामध्ये एकूण 225लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी अत्यंत गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या 22 लाभार्थ्यांना आज मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता मुंबई येथे पाठविण्यात आले.
शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांना मोफत प्रवास, निवास व भोजन व्यवस्थेसह मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. सर्व शस्त्रक्रिया या गुंतागुंतीच्या व अतिखर्चिक आहेत. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, रोटरी क्लब, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय संस्था, खाजगी रक्कम दाते इत्यादी मार्फत अनुदान उपलब्ध करुन शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. सन 2024-25 मध्ये जानेवारी 2025 अखेर एकूण 163 लाभार्थ्यांना अशाच प्रकारच्या गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया या अत्यंत यशस्वीरीत्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. तसेच 3 हजार 470 लाभार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.
सन 2015 पासून आजअखेर 2 हजार 850 लाभार्थ्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया व 28 हजार 400 लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पूर्णपणे मोफत पूर्ण करण्यात आल्या आहेत. डिसेंबर 2024 अखेर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये सांगली जिल्हा राज्यात द्वितीय स्थानी असून पुणे जिल्हा हा अग्रस्थानी आहे. तर कोल्हापूर विभागांतर्गत सांगली जिल्हा हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये प्रथम स्थानावर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी दिली.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबविला जात असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे सर्व वैद्यकिय अधिकारी, औषधनिर्माता व परिचारीका यांचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी कौतुक केले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर व डॉ. छाया पाटील यांच्या मार्गदशनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.