Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयकर विभागाने जप्त केलेलं 70 लाखांचं सोनं पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून गायब; कोर्ट म्हणालं, 'गहाळ..'

आयकर विभागाने जप्त केलेलं 70 लाखांचं सोनं पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून गायब; कोर्ट म्हणालं, 'गहाळ..'
 

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमध्ये ठेवलेलं आयकर विभागाने जप्त केलेलं सोनं गहाळ झालं आहे. या प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. न्यायालयाने या प्रकरणामध्ये आयकर विभाग व महाराष्ट्र बँकेला प्रत्येकी 35 लाख रुपये कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टाने 70 लाख रुपये जमा करण्याचे दिले आदेश
न्यायमूर्ती एम. एस. सोनक व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सोने प्रति तोळे 80 हजारांच्या पुढे गेले आहे. गहाळ झालेले सोने सुमारे 70 तोळे होते. त्यामुळे आयकर विभाग व बँकेने एकूण 70 लाख रुपये जमा करायला हवेत, असं न्यायालयाने म्हटलं. तसेच याबाबत योग्य ते आदेश पुढील सुनावणीत दिले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
ते सोनं म्हणजे पत्नीची शेवटची आठवण

हिरालाल मालू यांच्या पत्नीचे सोने आयकर विभागाने जप्त केलेले होते. 2005 मध्ये आयकर विभागाने ही कारवाई केली होती. त्यानंतर हिरालाल मालू यांच्या पत्नीचे निधन झाले. तिची शेवटची आठवण म्हणून हिरालाल यांना हे सोने हवे आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयामध्ये याचिका केली आहे. मात्र आयकर विभाग व बँक हे सोनं कुठे आहे यावरुन एकमेकांकडे बोट दाखवत आहे. परिणामी उभयतांनी 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही रक्कम कोर्टात जमा करावी, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. ही याचिका अधिकाधिक दंड ठोठावून फेटाळून लावावी, असे शपथपत्र बँकेने सादर केले. त्यावरही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. 

विशेष बैठक बोलावली
याबाबत निर्णय घेण्यासाठी आयकर विभाग बैठक घेणार आहे. या बैठकीत सोन्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे 14 फेब्रुवारी होणारी ही सुनावणी तहकूब करावी, अशी विनंती अॅड. सुरेश कुमार यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. बँकदेखील यासंदर्भात निर्णय घेईल अशी आम्हाला आशा आहे, असल्याचं खंडपीठाने नमूद केले आहे. त्यामुळे आता या दोन्ही संस्था या गहाळ झालेल्या सोन्याबद्दल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामान्यपणे मोठ्या कारवाईनंतर आयकर विभागाकडून जप्त केली जाणारी रक्कम आणि इतर वस्तू बँकेकडे सोपवल्या जातात. इथेही असेच झाले. मात्र नंतर या सोन्याचं काय झालं हे गूढ कायम आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.