मुंबई: आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'ऑपरेशन टायगर' मोहिम हाती घेत शिंदेसेनेने ठाकरेंकडील नेत्यांना पक्षात घेण्याचा चंग बांधला आहे. अलीकडेच राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडली.
त्यानंतर ते शिंदेसेनेत दाखल झाले. ठाकरेंची साथ सोडणाऱ्या नेत्यांची सध्या रीघ लागली आहे त्यात मातोश्री असलेल्या वांद्रे परिसरातच ठाकरेंना धक्का बसला. वांद्रे येथील उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी पक्षात अन्याय होत आहे असं सांगत त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानावळे यांनी मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पक्षात अन्याय होत असल्याचा सूर आवळला. त्यानंतर ते मातोश्रीतून बाहेर पडले आणि बंगल्याबाहेर नतमस्तक झाले. जितेंद्र जानावळे पक्षात राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत असतानाच संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदसेनेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
देशाला हिंदुत्वाचे विचार देणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते. मात्र उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह झाला आणि सगळे संपलं. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. तुम्ही सहकाऱ्यांना नोकर समजायला लागलात. मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. आपल्याकडून लोक का जातायेत याचं कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही. आज जितू आपल्याकडे आला. मातोश्रीवर पहिली मशाल घेऊन जाणारा हा जितेंद्रने आज धनुष्यबाण हाती घेतला. जो जाईल तो कचरा, त्यांना नवनवीन उपाध्या देतात असं सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
जानावळेंनी काय आरोप केले?
विलेपार्ले विधानसभेबाबत निर्णय घेणारे संजय राऊत आणि अनिल परब कोण आहेत? ही विधानसभा 'आप'ला दिली होती. पण आम्ही 'झाडू'बरोबर काम करायला विरोध दर्शवला. त्यामुळे ती जागा शिवसेनेकडे आली. भाजपाकडून ती जागा काढून शिवसेनेकडे घ्यायची होती, ही माझी इच्छा होती. पण माझी इच्छा लक्षात न घेता मला बाहेरच्या वॉर्डात टाकले. म्हणजे तुमचे मनसुबे काय आहेत? तुम्हाला संघटना जिंकवायची आहे की भाजपा जिंकवायची आहे? असा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्यावर माझा राग नाही. विभागीय राजकारण सुरू होते, त्याला कंटाळलो होतो. माझी राजकीय कोंडी विभागात केली. एवढे मी लढलो, माझी नोकरी आणि घर गेले. तरीही मी जिद्दीने उभा होतो असं जितेंद्र जानावळे यांनी म्हटलं होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.