सांगलीत काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; दोन गट नाराज
सांगली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लागलेले बंडखोरीचे खंडग्रास ग्रहण आता फुटीच्या खग्रास ग्रहणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असलेले दोन्ही गट सध्या पक्षीय कार्यापासून दूर वेगळ्या वाटेने जाण्याच्या विचारात दिसत आहेत. पक्षीय स्तरावर याबाबत कोणतीही पावले न उचलल्यास मोठा फटका जिल्ह्यातील काँग्रेसला बसणार आहे. सांगली विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. ही बंडखोरी रोखण्यात ना स्थानिक नेत्यांना यश आले ना राज्यस्तरावरील नेत्यांना. निवडणुकीत या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला. त्यानंतर मतदारसंघातील काँग्रेसचे राजकारण थंडावले.
जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व निवडणुकीतील अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यात अत्यंत टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले. सोशल मीडियावरील पोस्टवरून पोलिसांत तक्रारी व गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे लोकसभेला एकसंध असणारे हे दोन्ही गट टोकाच्या संघर्षाने विभागले गेले. राजकारण केवळ गटबाजीपुरते उरले नाही, तर पक्षफुटीपर्यंत टोकाला गेले आहे.
वादळापूर्वीची शांतता
जयश्रीताई पाटील यांनी पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. मात्र, वेगळा विचार करण्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाच्या चर्चाही सुरू आहेत. सध्या जयश्रीताई पाटील व त्यांच्या विरोधातील पृथ्वीराज पाटील यांचा गट शांत असला तरी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप नेत्यांशी मैत्रभाव
पृथ्वीराज पाटील यांच्या भेटीला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आले होते. पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार करण्यात आला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व पृथ्वीराज पाटील एकत्र आले होते. त्यांचा हा मैत्रभावही पक्षप्रवेशाच्या चर्चांना बळ देत आहे.कार्यकर्ते संभ्रमावस्थेत
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्र, तसेच सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात या दोन्ही गटांची ताकद आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मात्र, दोन्ही नेत्यांच्या शांत भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
लोकसभेला बांधकाम, विधानसभेला पडझड
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस एकसंध केली होती. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या काँग्रेस नेत्याला असे यश मिळाले होते. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झाला. मात्र, काँग्रेस एकजुटीच्या या गडाची पडझड लगेच विधानसभा निवडणुकीत झाली. आता पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.