प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट... ! पत्नीची हत्या करून पतीनेही संपविले जीवन
अमरावती : सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्नं रंगविणार्या एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाला आहे.पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः पतीनेसुद्धा आत्महत्या करून जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२३) रहाटगाव शेत शिवारात समोर आली आहे.
अमोल सुरेशराव गायकवाड (वय ३५) व शिल्पा अमोल गायकवाड (वय ३२) असे घटनेतील मृतकांचे नावे आहेत.घटनेमागील मूळ कारण अद्याप पुढे आले नाही. नांदगाव पेठ पोलीस सर्व बाजूने तपास करीत आहे. घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, मूळचे धामणगाव तालुक्यातील वाठोडा व सध्याचे रहाटगाव येथील रहिवासी अमोल सुरेशराव गायकवाड व रामगाव येथील शिल्पा गायकवाड यांचा सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. प्रज्वल विठ्ठलराव पात्रे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते. त्याठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊस मध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी अमोलचे वडील बाहेरगावी गेले होते आणि रविवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांनी मुलगा आणि सुनेला आवाज दिला. मात्र त्यांना प्रत्युत्तर न मिळाल्याने अमोलच्या वडिलांनी खोलीत जाऊन बघितले तर खोलीत पलंगावर शिल्पाचा मृतदेह दिसला तर अमोल फासावर लटकलेला होता. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला.
त्यांनी या घटनेची माहिती लगेच पोलिसांना दिली. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांना माहिती मिळताच ते देखील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले.श्वान पथक व फॉरेन्सीक टीमला सुध्दा यावेळी पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त सागर पाटील, फ्रेजरजरपुरा विभागाचे एसीपी कैलास पुंडकर हे सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शिल्पा व अमोल यांचे मृतदेह शवाविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. घटनेचे प्रमुख कारण अद्याप स्पष्ट नाही. अमोल ने शिल्पाची हत्या का केली असावी? स्वतः गळफास का घेतला? की यामध्ये काही घातपात आहे, अशा सर्वच बाजूने पोलीस तपास करीत आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कवडे पुढील तपास करीत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.