सांगली 'कोयताकांड'ने हादरली, नवऱ्याने गळ्यावर कोयत्याने वार करत बायकोला संपवलं, मिरजेत कोयता गँगमधील सराईताचा कोयत्यानेच मुडदा पाडला
सांगली शहर आणि मिरज शहर खुनाच्या घटनांनी हादरलं आहे. काल (23 फेब्रुवारी) रात्री सांगलीत कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाखाली एका महिलेचा खून झाला. मिरजेमध्येही एका युवकाचा खून झाला.
सांगली शहरात कौटुंबिक कारणातून पतीकडूनच पत्नीचा खून करण्यात आला. मिरजेत पुन्हा कोयता गँगचा वाद पुन्हा उफाळून आला. यातून कोयता गँगमधील सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला.
पत्नीची गळा चिरून खून
आयर्विन पुलाखाली पतीकडून पत्नीची गळा चिरून निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये प्रियांका चव्हाणचा जागीच मृत्यू झाला. प्रियांका चव्हाण व तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वाद असल्याने प्रियांका माहेरी सांगलीवाडीत गेल्या चार महिन्यांपासून राहत होती. तिला भेटण्यासाठी तिचा पती आज सांगलीत आला होता. त्याने तिला आयर्विन पुलाजवळ नेले. त्या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर प्रियांकाच्या पतीने तिच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून तिचा खून केला. रात्री नऊच्या सुमारास आयर्विन पुलाखाली हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर पती जकाप्पा चव्हाण हा पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. जकाप्पाला दारूचे व्यसन होते. दोघांमध्ये सतत वाद होत होता, म्हणून प्रियांका माहेरी आली होती. परंतु, प्रियांका माहेरी राहत असली तरी जकाप्पा चारित्र्याचा संशय घेत होता. या संशयातून त्याने खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत आहे.
कोयता गँगमधील सराईत गुन्हेगाराचा खून
अन्य एका घटनेत मिरज शहरात कोयता गँगमधील दोन गटात झालेल्या राड्यामध्ये कोयता गँगमधील सराईत गुन्हेगार कुणाल वालीवर कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. मयत कुणालचा भाऊ वंश वालीवरही टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयित हल्लेखोरांना अटक केली. या घटनेमुळे कोयता गँगमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
छातीवर, पोटावर कोयत्याने वार झाल्याने कुणाल वाली जागीच ठार
मिरजेत गेल्या काही दिवसांपासून दोन गटात राडा सुरू होता. यातून एकमेकांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. कुणाल वाली व त्याचा भाऊ वंश वाली हे दोघे रविवारी रात्री कमानवेसमधून जात होते. यावेळी हल्लेखोराने दोघांना अडविल्याने दोघात वाद झाला. यातून हल्लेखोराने कुणाल वाली व वंश वाली या दोघांवर कोयत्याने हल्ला केला. छातीवर, पोटावर कोयत्याने वार झाल्याने कुणाल वाली जागीच ठार झाला. तर वंश वाली हा गंभीर जखमी झाला. वंश वाली याच्यावर मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.