Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-आरेवाडी शाळेत मुलांना न पाठविण्याचा निर्धार


सांगली :-आरेवाडी शाळेत मुलांना न पाठविण्याचा निर्धार


नागज : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेच्या वादामुळे मुलांचा जीव धोक्यात असून जागेचा वाद मिटेपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.

संतप्त पालकांनी शाळेत आलेली मुले परत नेली. गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या पालकांच्या संतापाचा शुक्रवारी उद्रेक झाला.

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे स्वातंत्र्यपूर्व काळात प्राथमिक शाळेची इमारत बांधली आहे. सध्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे 170 विद्यार्थी शिकत आहेत. पण या इमारतीचा बराचसा भाग आणि इमारतीचे मैदान खासगी मालकीच्या जागेत आहे. केवळ दोन गुंठेच जागा शाळेच्या मालकीची असल्याचे सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात 15 ते 20 गुंठ्यावर शाळेची इमारत व मैदान आहे. गेल्या चार वर्षांपासून हा वाद आहे. जागा मालकाने वारंवार निदर्शनास आणूनही प्रशासन त्यांची दखल घेत नसल्याने त्यांनी शाळेच्या मैदानावर वैरण व काटेरी झुडपे रचली आहेत. शाळेच्या समोरील रस्ताही अडवला आहे. अर्थातच जागेच्या मालकाने शाळेच्या इमारतीसमोर मैदान ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.


दोन महिन्यात या मैदानावरील काटेरी झुडपावर पडून तीन मुले जखमी झाली आहेत. शुक्रवारी पालकांच्या भावनांचा उद्रेक दिसून आला. सुमारे पन्नासावर पालकांनी शाळेत येऊन जागेचा रास्त निर्णय होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केला. दरम्यान, याबाबत ग्रामसभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचे बैठकीत ठरले.पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, रमेश कोळेकर, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कोळेकर, माजी उपसरपंच अनिल कोळेकर उपस्थित होते.

मुलांच्या जीविताला धोका; पालक संतप्त

शाळेच्या जागेबाबत जागामालक व प्रशासन यांच्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने प्रशासनाला कळवले आहे. मात्र प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेतला नसल्याने जागा मालकाने शाळेच्या मैदानावरच काटेरी झुडपे, पालापाचोळा, वैरण वगैरे पसरले आहे. सध्या या पालापाचोळ्यात, काटेरी झुडपांमध्ये साप व अन्य विषारी प्राणी फिरताना दिसत आहेत. शाळेच्या वर्गखोल्यांमध्येही एकदा साप आढळून आला आहे. त्यामुळे मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.