बाप 'ब्रेन डेड', हॉस्पिटलमध्येच तिघी पोरींनी रचला कट, भावाला अंधारात ठेऊन मृत्यूपत्र तयार केलं अन्...
बाप आणि लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं मानलं जातं. लहानपणापासून बाप आपल्या लेकीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत असतो. मात्र, याच बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये तिघी लेकींनी असं काही केलं की, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बाप मृत्यूशी झुंज देत असताना लेकींनी संपत्ती मिळवण्यासाठी नको ते कृत्य केलं. ब्रेन डेड झालेला बाप वाचणार नाही, असं लक्षात आल्यावर लेकींनी हॉस्पिटलमध्ये कट रचला अन् भावाला अंधारात ठेऊन थेट मृत्यूपत्र तयार केलं.
मृत्युपत्रावर वडिलांच्या अंगठ्याचे ठसे
पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना पोटच्या तीन लेकींनी रुग्णालयात येऊन चोरून वडिलांच्या अंगठ्याचे ठसे बनावट मृत्युपत्रावर घेतले. पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीला कर्करोग आणि हृदयरोगाने ग्रासलं होतं. त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने 14 जानेवारीला मुलाने पिंपरीतील एका नामांकित रुग्णालयात दाखल केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती.
पेन देऊन सही घेण्याचा प्रयत्न
काही दिवसांपूर्वी ब्रेन डेड झाल्यावर तिघी मुलींनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात भरती असल्याचं माहिती असताना एकदाही मुली वडिलांना पहायला आल्या नाहीत पण वडिलांचं काही खरं नाही, असं लक्षात येताच मुलींनी रुग्णालयाच्या येरझाऱ्यात घालण्यास सुरूवात केली. मुली सलग तीन-चार दिवस भेटायला येऊ लागल्या. 19 फेब्रुवारी रोजी मुलगा रुग्णालयाच्या बाहेर गेला असताना मुली वडिलांच्या वॉर्डमध्ये गेल्या अन् मृत्यूपत्रावर वडिलांच्या अंगठ्याचे ठसे घेतले. त्यानंतर त्यांच्या हातात पेन देऊन सही घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
रुग्णालयातील प्रशासनाला जेव्हा ही गोष्ट कळाली, तेव्हा त्यांनी मुलींना थांबवलं अन् तातडीने पोलिसांनी कळवलं. भावाला देखील ही गोष्ट कळवली. मुलगा तातडीने वडिलांजवळ आला अन् त्याने बहिणींना झापलं. त्यानंतर मुलाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असताना तिघी बहिणींनी असं पाऊल उचलल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. वडील गेल्यानंतर भाऊ आपल्याला वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा देणार नाही, असा बहिणींचा समज झाला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.