एड्रियन सिमँकास एक कयाकर आहेत. कयाक म्हणजे एक छोटी, अरुंद होडी आणि कयाक चालवणाऱ्याला कयाकर म्हणतात. कयाकचा वापर साहसी खेळ म्हणून केला जातो. 23 वर्षांच्या एड्रियन यांना व्हेल माशानं गिळल्यानंतर सर्वात आधी त्यांच्या लक्षात आलेली बाब म्हणजे चिखल. "मी कोणत्यातरी भल्या मोठ्या प्राण्याच्या तोंडात आहे हे मला एका सेकंदानं जाणवलं. मला वाटलं की कदाचित त्यानं मला खाल्लं असेल. तो ऑर्का किंवा समुद्रातील राक्षसी किंवा महाकाय आकाराचा जीव असू शकेल," असं एड्रियन यांनी बीबीसीला सांगितलं.
ऑर्का हा व्हेलचाच एक प्रकार असून तुलनेनं त्याचे दात लहान असतात, त्याची पाठ काळ्या रंगाची, तर पोटाकडची बाजू पांढऱ्या रंगाची असते. त्यानंतर एड्रियन यांच्या मनात विचार येऊ लागला की, एका हंपबॅक व्हेल माशाच्या आत "पिनोकियोप्रमाणे" ते कसं काय वाचू शकतील. (पिनोकियो हे द अॅडव्हेंचर्स ऑफ पिनोकियो या लहान मुलांसाठीच्या पुस्तकातील एक काल्पनिक पात्र असून एक लाकडी बाहुला खराखुरा मुलगा होतो.) मात्र तितक्यात त्यांना व्हेल माशानं तोंडातून बाहेर फेकलं.चिलीच्या दक्षिणेकडील समुद्रात कयाक चालवताना घडलेली घटना एड्रियन व्हेनेझुएलाचे आहेत. ते त्यांच्या वडिलांबरोबर चिलीच्या पॅटागोनियन समुद्रकिनाऱ्याजवळ मॅगेलनच्या सामुद्रधुनीत कयाक चालवत होते. तेव्हा त्यांना जाणवलं की, काहीतरी गोष्ट त्यांना मागून आदळते आहे, त्यांच्या जवळ येते आहे आणि त्यांना बुडवते आहे.
एड्रियन यांचे वडील डॅल त्यांच्यापासून काही मीटर अंतरावरच होते. एड्रियन यांची ही अग्निपरीक्षा होती. त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाच्या काही क्षणांचा व्हिडीओ बनवण्यात त्यांच्या वडिलांना यश आलं. "मी माझे डोळे बंद केले आणि मी पुन्हा जेव्हा डोळे उघडले, तेव्हा मला जाणवलं की मी चक्क व्हेल माशाच्या तोंडात होतो," असं अॅड्रियन यांनी बीबीसीला सांगितलं.
"मला माझ्या चेहऱ्यावर एक पातळ ब्रश घासल्यासारखं वाटलं," असं एड्रियन यांनी पुढे सांगितलं. ते म्हणाले की त्या क्षणी त्यांना फक्त गडद निळा आणि पांढरा रंग दिसत होता. "मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की, जर व्हेल माशानं मला गिळलं असतं, तर मी काय केलं असतं. कारण तसं होण्यापासून रोखण्यासाठी मी काहीही करू शकलो नसतो," असं ते म्हणाले.एड्रियन यांचे 49 वर्षांचे वडील, डॅल सिमॅकास जवळच दुसऱ्या एका कयाकमध्ये होते. या सर्व घटनाक्रमाकडे ते थक्क होऊन अविश्वासानं पाहत होते. या बापलेकांनी थोड्या वेळापूर्वीच ईगल बे (Eagle Bay) ओलांडला होता. चिलीच्या अगदी दक्षिणेला असलेल्या पंटा अरेनास (Punta Arenas) या शहराच्या किनाऱ्याजवळच हा भाग होता. त्यावेळी एड्रियनच्या वडिलांनी त्यांच्या मागे काहीतरी धडकल्याचा आवाज ऐकला होता.
"यानंतर आता पुढे काय करायचं, या गोष्टीचा मला विचार करावा लागला," असं एड्रियन सांगतात. मात्र काही सेकंदांमध्येच एड्रियन यांना जाणवलं की ते पृष्ठभागावर येत आहेत. एड्रियन त्या क्षणांबद्दल म्हणाले, "मला माझा श्वास रोखून धरता येईल की नाही याची मला थोडी भीती वाटत होती. कारण मी पाण्यात किती खोलवर आहे याची मला कल्पना नव्हती. मला असं वाटलं की पाण्याच्या पृष्ठभागावर येण्यासाठी मला बराच वेळ लागला." ते पुढे म्हणाले, "दोन सेकंदांसाठी मी वर गेलो आणि शेवटी मी पृष्ठभागावर पोहोचलो. त्यावेळेस मला जाणीव झाली की व्हेल माशानं मला खाल्लं नव्हतं."
कॅमेरात रेकॉर्ड झाला अद्भूत प्रसंग
डॅल म्हणाले, "मी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा मला एड्रियन दिसला नाही." "एक क्षणभर मी चिंताग्रस्त झालो होतो. जेव्हा मी एड्रियनला सुमद्राच्या पाण्यातून वर पृष्ठभागावर येताना पाहिलं तेव्हा मी निश्वास सोडला," असं डॅल यांनी सांगितलं. "मग मला काहीतरी दिसलं. ते एक भलंमोठं धूड होतं. त्याचा आकार पाहून मी लगेचच अंदाज बांधला की तो व्हेल मासा होता," असं ते पुढे म्हणाले.
उसळत्या लाटांचं चित्रीकरण करता यावं म्हणून डॅल यांनी त्यांच्या कयाकच्या मागच्या बाजूला एक कॅमेरा बसवला होता. या कॅमेऱ्यानंच त्यांच्या मुलावर बेतलेल्या विलक्षण आणि थक्क करणाऱ्या प्रसंगाचा क्षण टिपला होता. व्हिडिओमध्ये ते क्षण पुन्हा पाहताना, तो व्हेल मासा किती प्रचंड होता हे पाहून एड्रियन यांना धक्काच बसला. सात वर्षांपूर्वी एड्रियन त्यांच्या वडिलांबरोबर व्हेनेझुएलातून चिलीमध्ये गेले होते. चांगल्या आयुष्याच्या शोधात ते तिकडे गेले होते.
"व्हेल माशाचा मागचा भाग केव्हा दिसतो, त्याचे कल्ले केव्हा दिसतात हे मी पाहिलं नव्हतं. मात्र त्याबद्दल ऐकलं होतं. त्यामुळे मी घाबरलो होतो," असं एड्रियन म्हणाले. ="नंतर त्या प्रसंगाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला जाणीव झाली की, माझ्यासमोर व्हेल मासा इतक्या प्रचंड आकारात आला होता की, जर कदाचित मी त्याला पाहिलं असतं, तर मला आणखी जास्त भीती वाटली असती," असं एड्रियन म्हणाले.
'व्हेलनं कयाकसह माणूस गिळणं निव्वळ अशक्य'
एड्रियन यांच्यासाठी हा केवळ जिवंत राहण्याचा अनुभव नव्हता. तर ज्यावेळेस व्हेलनं त्यांना बाहेर थुकलं, तेव्हा त्यांना वाटलं की त्यांना "जगण्याची दुसरी संधी" मिळाली. "पृथ्वीवरील सर्वात दुर्गम आणि कठीण ठिकाणी आलेल्या या अनोख्या अनुभवामुळं मी त्या क्षणापर्यंत काय चांगलं करू शकलो असतो याचा विचार करण्यास आणि त्या अनुभवाचा मी फायदा कशाप्रकारे घेऊ शकतो, त्या अनुभवाचा वापर कसा करू शकतो या गोष्टीचा विचार करण्यास प्रवृत्त केलं," असं पुढे एड्रियन म्हणतात.
मात्र व्हेलच्या जबड्यातून एड्रियन इतक्या चटकन कसे काय निसटू शकले यामागे एक साधं कारण आहे, असं वन्यजीव तज्ज्ञांना वाटतं. हंपबॅक व्हेल जरी आकारानं महाकाय असला, तरी त्याचा घसा अतिशय अरुंद असतो. "साधारणपणे एखाद्या घरगुती पाईपच्या आकाराचा तो असतो". त्याच्या गळ्याची रचना छोटे मासे, कोळंबी यासारखे समुद्री जीव गिळण्यासाठी असते, असं रोचेड जेकबसन सेबा यांनी बीबीसीला सांगितलं. ते ब्राझीलमधील संवर्धनवादी आहेत.
"त्यामुळे हंपबॅक व्हेलना कयाक होड्या, टायर किंवा अगदी ट्युना माशासारख्या मोठ्या वस्तू गिळणं प्रत्यक्षात शक्य नसतं," असं रोचेड म्हणाले. "याच कारणामुळे शेवटी व्हेलनं कयाकसह एड्रियन यांना बाहेर फेकलं. कारण ते गिळणं व्हेलसाठी अशक्य होतं," असं त्यांनी नमूद केलं. हंपबॅक व्हेलनं कदाचित अपघातानंच एड्रियन यांना गिळलं असेल, असं रोचेड सांगतात. तो व्हेल मासा बहुधा छोट्या माशांच्या एका झुंडीला खात होता आणि तेव्हाच अनावधानानं त्यानं एड्रियन यांच्या कयाकला देखील गिळलं. "मासे खात असताना व्हेल खूप वेगानं पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्यावेळेस ते त्यांच्या मार्गात येणाऱ्या वस्तूंना अपघातानं धडकू शकतात किंवा त्या गिळू शकतात," असं रोचेड सेबा सांगतात.
एड्रियन यांच्यावर बितलेल्या प्रसंगाच्या निमित्तानं रोचेड यांनी एक इशारा दिला. ही घटना "एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण" करून देते. ती म्हणजे समुद्रात ज्या भागात व्हेल मासे वावरत असतात, त्या भागात पॅडलबोर्ड, सर्फरबोर्ड किंवा इतर अशा होड्या ज्या शांतपणे चालतात त्यांचा वापर करणं टाळलं पाहिजे. व्हेल माशांचं निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावर संशोधन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींचं इंजिन नेहमी सुरू ठेवलं पाहिजे. कारण त्या बोटींच्या इंजिनाच्या आवाजामुळे व्हेल माशांना या बोटींचं अस्तित्व लक्षात येतं, असं रोचेड पुढे सांगतात.
लुईस बरुचो आणि माया डेव्हिस यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.