पुणे : पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी कार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आम्हाला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या सांविधानिक अधिकारांचे
उल्लंघन झाले आहे, असा दावा करत सुटका करण्याची मागणी करणारी याचिका शिवानी
आणि विशाल अग्रवाल यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने या याचिकेसह अशाच प्रकारच्या ४० याचिका दोनपेक्षा जास्त न्यायमूर्ती असलेल्या खंडपीठाकडे पाठविल्या आहेत. कल्याणीनगर अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०) आणि आई शिवानी विशाल अग्रवाल (वय ४९, दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना जुलै महिन्यात अटक करण्यात आली आहे.
शिवानी यांनी मुलाच्याऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे, तर विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी यांचे रक्त घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र, अटक करताना कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली नाही, असे नमूद करत अग्रवाल दांपत्याचे वकील सिद्धार्थ अग्रवाल आणि ॲड. नारायण रोकडे यांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये आरोपींना अटक का केली, याची कारणे असलेला रकाना रिकामा ठेवला आहे. त्या आधारे दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांकडे ठोस कारण नसल्याचे बचाव पक्षाचे म्हणणे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.