बीड: कोणी बसस्थानकावर एकटे फिरताना आढळले, कोणी भिक मागताना आढळले अशा बालकांना बाल संरक्षण समितीने बालगृहात पाठवले. पण, दोन वर्षे लोटले तरी या चिमुकल्यांना न्यायला त्यांचे पालक फिरकलेलेच नाहीत. सदर बालके आर्वी (ता. शिरुर कासार) येथील शांतीवन गुगरुकुलच्या बालगृहात आपल्या आई - बाबांची वाट पाहत आहेत. आता महिनाभरात या बालकांच्या पालकांनी संपर्क केला नाही तर ही बालके दत्तक प्रक्रीयेसाठी पात्र होणार आहेत. बेवारस आढळलेले बालक, रस्त्यावर भिक मागणारे बालक, एखाद्या गुन्ह्यात सापडलेले विधीसंघर्षग्रस्त बालकांना जिल्हा बालकल्याण समितीसमोर सादर केले जाते. बालकल्याण समिती या बालकांना बालगृहात पाठवते. अशा सात बालकांना या दोन वर्षांत त्यांच्या आई- वडिल भेटायला किंवा न्यायला आलेच नाहीत. अशी सात बालके मागच्या दोन वर्षांहून अधिक काळापासून बालगृहात आहेत.
यातला माणिक उत्तरेश्वर यादव हा साडे दहा वषर्षांचा आहे. डाव्या गालावर तिळ असलेल्या माणिक नोव्हेंबर २०२२ पासून बालगृहात आहे. विशेष म्हणजे यातले बहुतांशी बालके पहुर पेठ (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील असून यात तिघांच्या नावांवरुन ते सख्खी भावंडे आहेत. १२ वर्षांची रेश्मा गणेश पवार ऑक्टोबर २०२३ पासून शांतीवनच्या बालगृहात आहे. तिचा पत्ता पहूर पेठ, ता. जामनेर, जि. जळगाव असा आहे. रंगाळने काळी सावळी असलेली रेश्माच्या डोळ्यावर काळा तिळ आहे. साधारण १० वर्षांचा सूर्या रेश्मा पवार हा देखील ऑक्टोबर २०२३ पासून बालगृहातच आहे. त्याचा पत्ताही पहुर पेठ (ता. जामनेर, जि. जळगाव) असाच आहे. गोऱ्यारंगाच्या सुर्याच्या उजव्या बाजूला मानेवर तीळ आहे.बालकल्याण समिती जळगाव यांच्या बदली आदेशाने त्याला बीडला पाठविलेले आहे. राज रेश्मा पवार याचे वय तर केवळ सहा वर्षांचे आहे. तो आर्वीच्या शिशुगृहात आहे. त्याचाही पत्ता पहूर पेठ (ता. जामनेर, जि. जळगाव) असाच आहे. गोऱ्यारंगाच्या राजचा चेहरा गोलाकार आणि छातीवर तीळ आहे. त्यालाही जळगावच्याच बालकल्याण समितीने बीडला पाठविलेले आहे. ११ वर्षे पाच महिन्यांची गंगा रेश्मा पवार ही देखील पहूर पेठ (ता. जामनेर) येथीलच आहे. ऑक्टोबर २०२३ पासून तिच्याही पालकांनी संपर्क साधलेला नाही. साडे पाच वर्षांची जया विदेश उपाध्याय व सव्वा आठ वर्षांचा तिचा भाऊ स्वदेश विदेश उपाध्याय यांना तर त्यांचा पत्ताच सांगता आलेला नाही. ही दोन चिमुकलेही बालगृहात आहेत.
तर होऊ शकते दत्तक प्रक्रीया
बाल संरक्षण समितीने बालगृहात असलेल्या मुलांच्या पालकांनी आता महिनाभरात संपर्क केला नाही तर त्यांची माहिती निरा या दत्तक प्रक्रीया करणाऱ्या वेबसाईटसाठी पुरविली जाते. त्यानंतर त्यांची दत्तक प्रक्रीया होते. या बालकांच्या पालकांनी संपर्क साधून त्यांना न्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांनी केले. सदर बालके शांतीवन मुलांचे बालगृह आर्वी (ता. शिरुर कासार, जि. बीड) व सुलभा सुरेश जोशी शिशुग्रह आर्वी (ता. शिरुर कासार, जि. बीड) येथे आहेत. संपर्कासाठी ९९२३७७२६९४, ९४२१२८२३५९ या क्रमांकावर फोन करण्याचेही आवाहन करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.