अयोध्येमध्ये एका तरूणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या धक्कादायक घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
अशातच आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी देखील या घटनेचा निषेध करत सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अयोध्येत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे. अयोध्येत घडलेली घटना लज्जास्पद असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले कि, तीन दिवसांपासून पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या मदतीच्या हाकेकडे प्रशासनाने लक्ष दिले असते, तर कदाचित तिचे प्राण वाचले असते. आणखीन एका अपराधामुळे एका मुलीचा मृत्यू झाला असून अजून किती दिवस आणि किती कुटुंबियांना त्रास सहन करावा लागणार आणि मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागणार? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
बहुजन विरोधी भाजप राजवटीत विशेषत: उत्तर प्रदेशात दलितांवरील घृणास्पद अत्याचार, अन्याय आणि हत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. उत्तर प्रदेश सरकारने या गुन्ह्याची तातडीने चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. तसेच जबाबदार पोलिसांवर देखील कठोर कारवाई करावी. कृपया नेहमीप्रमाणे पीडित कुटुंबाला त्रास देऊ नका. देशातील मुली आणि संपूर्ण दलित समाज तुमच्याकडे न्याय मागत आहे, अशी पोस्ट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
अयोध्येत तीन दिवसांपासून एक मुलगी बेपत्ता झाली होती. सदर मुलगी ही १० वाजता धार्मिक कार्यक्रमाला जात असल्याचं सांगत घरातून बाहेर पडली. मात्र ती घरी परतलीच नाही. कुटुंबियांनी मुलगी हरवली असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार केल्यानंतर एका गावातल्या जंगलात शनिवारी तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्याचे कुटुंबियांना सांगितले.तरुणीचे डोळे काढले, हाता – पायांना दोरी बांधली होती. तसेच तिच्या शरिरावर नखांचे ओरखडे आणि जखमांच्या खुणा आहेत. शरीरातील काही भागातील हाडं तुटली होती. तिचे कपडे, देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे तीन ग्लासही आढळून आले. या घटनेनंतर मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.