विटा : मोटारीने धडक दिल्याने महिला पोलिस मोपेडस्वार प्रितंका अनंत पोटे (वय ३२, देवराष्ट्रे, ता. कडेगाव) या जागीच ठार झाल्या. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलवडी (भा. ता. खानापूर) येथे बलवडी फाट्यावर झाला. याबाबत महिलेचा दीर सागर सर्जेराव लोंढे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. प्रितंका पोटे या तुरची येथील पोलिस
प्रशिक्षण केंद्रात मैदानी खेळाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या.
मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास देवराष्ट्रे येथून तुरची येथे पोलिस
प्रशिक्षण केंद्राकडे मोपेड (एमएच १० डीएच ९९०६) वरून निघाल्या होत्या.
बलवडी फाटा येथे चारचाकीने मोपेडला जोरात धडक दिली.
सकाळी पावणेसहाच्या सुमारास प्रितंका यांचे पती संतोष यांना त्यांचे मित्र अक्षय शिंदे यांनी फोनवरून प्रितंका यांचा अपघात झाल्याचे कळविले. नातेवाइकांनी तातडीने बलवडी फाट्याकडे धाव घेतली. त्यावेळी प्रितंका यांची मोपेड आणि चारचाकी (एमएच १० इके ०६१४) यांचा भीषण अपघात झाला होता. अपघात इतका भीषण होता की पोटे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. पोटे यांच्या मोपेडसह चारचाकीचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान, विटा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. प्रितंका पोटे यांचा मृतदेह पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, चारचाकी चालक उदय रामचंद्र पवार (रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) याने भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, निष्काळजीपणे वाहन चालवून प्रितंका यांच्या मोपेडला समोरून जोरात धडक देऊन त्यांच्या मृत्यूस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.