इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे बिगूल वाजले आहेत. यंदाचा हा आयपीएलचा १८ वा हंगाम असणार आहे. गेल्या तीन वर्षांप्रमाणेच यंदाही आयपीएलमध्ये १० संघ स्पर्धा करताना दिसणार असून ७४ सामन्यांचा हा हंगाम असणार आहे.
रविवारी (१६ फेब्रुवारी) या हंगामाचे वेळापत्रक घोषित झाले आहे. आयपीएल २०२५ स्पर्धा शनिवारी, २२ मार्चला सुरू होणार आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळला जाईल. केकेआरच्या घरच्या मैदानात इडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना रंगेल.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघात हैदराबादमध्ये सामना होईल, तर त्याचदिवशी संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना चेन्नईला रंगेल. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे एकदाच आमने-सामने येणार आहेत. हा सामना ७ एप्रिलला होईल. तसेच चेन्नई सुपर किंग्स त्यांचे पहिले चार सामने घरच्या मैदानात खेळणार आहेत.
अंतिम सामना २५ मे रोजी खेळवला जाणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या हंगामातही डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) खेळवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ९ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर १२ दिवसातच आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात होणार आहे. एकूण १२ ठिकाणी आयपीएलचा १८ वा हंगाम खेळला जाणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे होम आणि अवे प्रकारात हा हंगाम होईल. राजस्थान रॉयल्स त्यांचे दोन घरचे सामने गुवाहाटीला खेळणार आहे. तसेच पंजाब किंग्स त्यांचे दोन घरचे सामने धरमशाला येथे खेळणार आहेत.
(बातमी अपडेट होत आहे.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.