राज्यात पुन्हा भूकंप? NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या संपर्कात?
सध्या भाजपच्या वाटेवर अनेक नेते असल्याचे बोलले जात आहे. यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्य जयंत पाटील यांचे देखील नाव आहे. जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या असून त्यांची भेट भाजपचे केंद्रीय नेते आणि रस्ते वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी घेणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सांगली जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांचे 40 आमदार त्यांच्या सोबत गेले. तर पक्षाचे काही दिग्गज नेत्यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता काही दिवसांपूर्वीच आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यानंतर आणखी काही नेते भाजपसह इतर पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
यादरम्यान प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीलचं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तर या चर्चांना भाजपचे केंद्रीय नेते आणि रस्ते वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचा सांगली दौरा कारणीभूत ठरला आहे. गडकरी इस्लामपूर येथील राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत. गडकरी शैक्षणिक संस्थांमधील विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. मात्र खरे कारण हे जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांची झालर आहे.
नितीन गडकरी 17 फेब्रुवारी रोजी राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत. ते येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आरआयटी या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणात सुसज्ज आणि अद्ययावत इमारतीचे उद्घाटन करतील. विशेष बाब म्हणजे जयंत पाटील यांचा रविवार (दि. 16) फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे.
लोकनेते राजारामबापू हे देखील पूर्वी जनता पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासह विविध पदांवर तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणून अग्रभागी होते. ते अखेरपर्यंत जनता पक्षात होते. त्यांच्या निधनानंतर म्हणजे 1984 नंतर या मतदारसंघावर पकड ठेवण्याची जबाबदारी आ. जयंत पाटील यांनी सक्षमपणे आठव्या विधानसभा विजयापर्यंत पेलली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रबादी काँग्रेसने घसघशीत यश संपादन केले.
विधानसभा निवडणुकीत मात्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड झाली. म्हणावे तसे आमदार देखील निवडूण आले नाहीत. तर जयंत पाटलांचेही मताधिक्य घडले. त्यांचे तब्बल मताधिक्य 70 हजारावरून घटून 13-14 हजारापर्यंत आले. यानंतरच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याची मागणी केली जातेय. सध्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पद बदलाच्या हालचालींना वेग आला असतानाच जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल देखील उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पण जयंत पाटलांचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच राजारामबापू शिक्षण आणि उद्योग समूहातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.