सध्या म्हैसाळ योजनेद्वारे दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी १७.४४ टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी असून, या बंधाऱ्याची क्षमता ३७१ दशलक्ष घनफूट आहे. जयसिंगपूर :कृष्णा नदीवर कनवाड
(ता.शिरोळ) ते म्हैसाळ (ता. मिरज) दरम्यान एक टीएमसी क्षमतेचे बॅरेज (छोटे
धरण) उभारण्यात येणार आहे. याचा लाभ २८ किमी परिसरातील गावांना होणार आहे.
यासाठी दोन वर्षांपूर्वी १८६ कोटींचा निधी मंजूर झाला होता. काही
दिवसांपासून कामाला सुरुवात झाली आहे.
पाटबंधारेकडून बैठक हवी
बॅरेजवरून कनवाड, कुटवाडमधून नव्याने रस्ता होणार आहे. त्याचबरोबर पलीकडे म्हैसाळ बाजूलाही असाच रस्ता होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यामुळे होणारा रस्ता कोठून होणार आहे आणि जमीन किती संपादित होणार, याची माहिती कनवाड व कुटवाडच्या शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने बैठक घेऊन संवाद साधणे गरजेचे आहे. सध्या तरी येथून रस्ता जाणार, तेथून रस्ता जाणार याचीच चर्चा या तीन गावांत सुरू आहे.
१००५ दशलक्ष घनफूट क्षमता
सध्या म्हैसाळ योजनेद्वारे दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी १७.४४ टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी असून, या बंधाऱ्याची क्षमता ३७१ दशलक्ष घनफूट आहे. नवीन होणाऱ्या बॅरेजमुळे याची साठवण क्षमता १ हजार ५ दशलक्ष घनफुटापर्यंत वाढणार असून, याला १६ गेट असणार आहेत. यामुळे अर्जुनवाड, उदगाव, कोथळी, सांगली, डिग्रज अशा २८ किमीपर्यंत या पाण्याचा बॅकवॉटर होऊन मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर म्हैसाळ योजनेतून सांगोला व मंगळवेढ्यापर्यंत हे पाणी पोहचवता येणार आहे.
म्हैसाळ योजनेसाठी उपयुक्त
कृष्णा नदीवर म्हैसाळ-कनवाड येथे सध्या कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. याच्या जवळच म्हैसाळ योजना असून, येथील पाणी उपसा करून ते कवठेमहांकाळ, जत अशा दुष्काळी तालुक्यात पोहचवले जाते. सध्या असलेल्या बंधाऱ्यात अपुरा पाणीसाठा होत असल्याने पाच वर्षांपूर्वी येथे नवीन बंधारा करण्यासाठी हालचाली झाल्या होत्या. प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वी १८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हिप्परगी (ता. जमखंडी) येथील बॅरेंज (छोटे धरण) अशा पद्धतीने होणार आहे. त्याचबरोबर म्हैसाळ योजनेसाठी उपयुक्त ठरणार असून, शिरोळ, सांगलीला आणखी लाभदायक ठरणार आहे.
प्रशासनाच्या आदेशाकडे डोळे
शिरोळ तालुक्यातील कनवाड, कुटवाड, घालवाड व मिरज तालुक्यांतील म्हैसाळ, ढवळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. सध्यातरी धरणाच्या बांधकामासाठी खोदाई सुरू असली तरी प्रत्यक्षात धरणावरून येणारा नवीन रस्ता कोठून जाणार आहे, याची माहिती शेतकऱ्यांना नाही. छोटे धरण उन्हाळ्याच्या दिवसात शेतकरी आणि गावांसाठी फायद्याचे आहे. होणाऱ्या रस्त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमीन हस्तांतरित करून घ्यावी.-बाबासाहेब आरसगोंडा, माजी सरपंच, कनवाड
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.