केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजे 26 मार्च 2025 पासून सुवर्ण मुद्रीकरण योजना(GMS) बंद करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. बाजारातील बदलत्या परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. बँका अजूनही 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसह अल्प-मुदतीच्या सुवर्ण ठेव योजना चालवू शकतील असंही सरकारनं सांगितलं आहे.
सुवर्ण मुद्रीकरण योजना
सुवर्ण मुद्रीकरण योजना योजना ही 15 सप्टेंबर 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. ज्याचा उद्देश देशातील घरांमध्ये आणि संस्थांमध्ये पडून असलेल्या सोन्याचा उत्पादक हेतूंसाठी वापर करणे आणि सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा होता. नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेद्वारे आतापर्यंत सुमारे 31,164 किलो सोने जमा झाले आहे.
मध्यम आणि दिर्घ मुदतीच्या सुवर्ण ठेव योजना बंद
सरकारने मध्यम मुदतीच्या (5-7 वर्षे) आणि दीर्घ मुदतीच्या (12-15 वर्षे) सुवर्ण ठेव योजना बंद केल्या आहेत. परंतू बँका त्यांच्या स्तरावर अल्प मुदतीच्या (1 ते 3 वर्षे) ठेव योजना राबवू शकतात.
ठेवीदारांच्या सोन्याचे काय होणार?
जर तुम्ही या योजनेत सोने जमा केले असेल तर घाबरण्याची काही गरज नाही. जर तुमची ठेव पूर्ण झाली असेल तर तुम्ही ती सोने किंवा रोखीने काढू शकता, असे सरकारने स्पष्ट केले आहे. याशिवाय ज्यांच्या ठेवी अजूनही चालू आहेत त्यांना व्याज मिळत राहील आणि मुदतपूर्तीवर पैसे किंवा सोने मिळतील. जर तुम्हाला वेळेपूर्वी सोने काढायचे असेल, तर पूर्वीचे नियम लागू होतील, ज्यामध्ये कपात होऊ शकते. 26 मार्च नंतर काय होणार असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला तर? त्यामुळे आता नवीन सोने मध्यम आणि दीर्घकालीन योजनांमध्ये जमा करता येणार नाही. तर आधीच जमा केलेले सोने त्याच पद्धतीने चालू राहील.
किती सोने जमा केले?
अल्पकालीन: 7,509 किलो
मध्यम मुदत: 9,728 किलो
दीर्घकालीन: 13,926 किलो
या योजनेत एकूण 5,693 लोकांनी आपले सोने जमा केले होते.
सोन्याच्या दरात मोठी वाढ
1 जानेवारी 2024 रोजी सोन्याचा भाव 63,920 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो 25 मार्च 2025 पर्यंत 41.5 टक्क्यांनी वाढून 90,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यामुळे तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल, तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. सरकार तुमच्या ठेवींच्या सुरक्षिततेची हमी देत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.