मिरजेत दुचाकी चोरणाऱ्यांना अटक:, महात्मा गांधी पोलीस चौक यांची कारवाई
मिरज, ता. १०: शहरातील विविध भागांसह सांगली ग्रामीण आणि इस्लामपूर पोलिसांच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी जेरबंद केले. रमेश ऊर्फ शुभम प्रमोद कांबळे (वय २४, रा. बौद्ध वसाहत, नदीवेस, मिरज) आणि प्रथमेश बाबासाहेब सुर्वे (२५, रा. बहे-नरसिंगपूर, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मिरज शहरातील वाढत्या दुचाकी चौरींच्या घटनांमुळे महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने विशेष गस्त सुरू कैली आहे. त्यानुसार शनिवारी (ता. 2) पथक गस्तीवर असताना, त्यांना दोघे संशयित मिरज-कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाऊन सापळा लावला. थोड्याच वेळात दोघेही संशयित तिथे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्यांनी जवळ असलेली दुचाकी भारतनगर येथून चोरल्याची कबुली दिली; तसेच आणखीही दुचाकी चोरल्या असून, त्या हैदरखान विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाखाली लावल्याचेही सांगितले. पोलिस पथकाने तत्काळ तिथे जात पाच दुचाकी ताब्यात घेतल्या. दोघाही संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, विठ्ठल गुरव, सूरज पाटील, अभिजित धनगर, अभिजित पाटील, मोनीस टिनमेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत महात्मा गांधी चौक, सांगली ग्रामीण आणि इस्लामपूरच्या हद्दीतील गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.