राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अचानक घरात शिरलेल्या तीन जणांनी भाजप नेत्याची निघृण हत्या केली आहे. आरोपींनी विषारी इंजेक्शन देऊन भाजप नेत्याचा जीव घेतला आहे. एका राजकीय नेत्याची अशाप्रकारे दिवसाढवळ्या हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील दाबथरा गावात घडली आहे. इथं भाजप नेते गुलफाम सिंह यादव यांची दिवसाढवळ्या विषारी इंजेक्शन देऊन हत्या करण्यात आली. ७० वर्षीय गुलफाम सिंह यादव हे आपल्या घरात बसले होते, यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी घरात घुसून त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यांना काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यांना विषारी इंजेक्शन देऊन पळ काढला.
कुटुंबीयांनी गुलफाम सिंग यादव यांना ताबडतोब गुन्नौर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर झाल्यावर त्यांना अलीगढ येथे हलवण्यात आलं. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अलीगढमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन केले आणि तपास सुरू केला. घटनेची माहिती मिळताच संभलचे एसपी केके बिश्नोई आणि सीओ दीपक तिवारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. पोलीस आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचे स्कॅनिंग करत आहेत. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागल्याचा दावा केला जातोय. ज्यामुळे लवकरच हल्लेखोरांना अटक होऊ शकते, असं सांगितलं जातंय.
2004 मध्ये गुन्नौर विधानसभा पोटनिवडणुकीत मुलायम सिंह यादव यांच्याविरुद्ध गुलफाम सिंह यादव यांनी निवडणूक लढवली होती. ते भाजपचे उमेदवार होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यकर्ता, भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे भाजप उपाध्यक्ष देखील होते. त्यांचा मोठा मुलगा दिव्य प्रकाश संभल जिल्ह्यातील जनाबाई ब्लॉकचा ब्लॉक प्रमुख आहे. गुलफाम सिंह यादव यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.