सातबाऱ्यात चूक असेल तर दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर
शेतीचा सातबारा किंवा जमिनीशी संबंधित जी कागदपत्रे असतात, त्यात संगणकावर टायपिंग करत असताना काही वेळा चुका झालेल्या आहेत किंवा पूर्वी सातबारा उतारा हस्तलिखित असायचे तेव्हा देखील हाताने लिहिताना चुका व्हायच्या. जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७/१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहिती मध्ये, जसे ७/१२ चे एकूण क्षेत्र, क्षेत्राचे एकक, खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र या मध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकता.
त्यासाठी कृपया https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in ही लिंक वापरून Mutation ७/१२ या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहिती नुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करून जुना हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करावा. यासाठी तुम्हाला https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/Account/Register या वेबसाईटवर जाऊन तुमचे युजर अकाऊंट करणे गरजेचे आहे. यात तुम्ही तुमचे नाव, मेल आयडी, मोबाईल नंबर, तुम्हाला यासाठी जो हवा तो पासवर्ड टाकून सेंड ओटीपी म्हणायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल व मेलवरील ओटीपी टाकून पुढील सगळी माहिती भरून सबमिट म्हणायचे आहे त्यानंतर तुम्हाला लॉगीन करताना तुमचा मेल आयडी आणि तुम्ही अकाऊंट तयार करताना जो पासवर्ड टाकला तो टाकून लॉगीन करणे गरजेचे आहे. त्या नंतर Mutation ७/१२ या पर्यायामध्ये जाऊन तुम्हाला जी दुरुस्ती करायची ती माहिती भरून, कागदपत्रे अपलोड करावीत व सबमिट करून येणारी प्रिंट तलाठी कार्यालयाला द्यावी.
पुढे हे सर्व पुरावे तलाठी तपासतो. झालेली दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यतेसाठी पाठवली जाते. या प्रकरणी चौकशीचे आदेश संबंधित तहसीलदार तलाठ्याला देत असतात. पण या चुका दुरुस्त करण्यापूर्वी संबंधितांना नोटीस बजावणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या चुका शक्यतो वेळीच दुरुस्त करणे फायद्याचे ठरते. अन्यथा नंतर ते कटकटीचे ठरू शकते. त्यामुळे याबाबत जागरूक राहावे.
सातबारा पुनर्लेखन करताना एखादा शेरा किंवा एखाद्या खातेदाराचे नाव लिहिण्याचे राहून गेले असेल तर अशा प्रकारची चूक या कायद्यांतर्गत दुरुस्त करता येते. दर दहा वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखन होत असते. त्यावेळी जर एखाद्या खातेदाराचे नाव किंवा एखादा शेरा चुकीने राहिलेला असेल आणि पूर्वीच्या अभिलेखात तो असेल, मात्र नवीन अभिलेखात नसेल तर अशा प्रकारची चूक कलम १५५ अंतर्गत दुरुस्त करता येते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.