अवैध वाळूचा टिप्पर सोडण्यासाठी खासगी व्यक्तीमार्फत एक लाख ८० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड याच्यासह पोलिस शिपाई गोकुळदास देवळे याला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (ता. एक) बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तक्रारदाराचा अवैध वाळूचा टिप्पर आष्टी पोलिसांनी पकडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हा टिप्पर सोडण्यासह तक्रारदाराच्या भावाला जामीन देण्यास मदत करण्यासाठी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन इंगेवाड याने दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. शिवाय पोलिस शिपाई गोकुळदास देवळे याने दोन लाखांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली.
त्यानंतर शनिवारी विष्णू बालासाहेब कुरदणे (वय ३२, रा. पांडे पोखरी, ता. घनसावंगी) यास तक्रारदाराकडून आष्टीतील एका दुकानात सहायक पोलिस निरीक्षक इंदेवाड, पोलिस शिपाई देवळे याच्या सांगण्यावरून तडजोडीअंती एक लाख ८० हजारांची लाच घेताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. तिघांना अटक करण्यात आली असून, याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.