राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा आणि गृह अशी दोन महत्त्वाची खाती आहेत. चंद्रपुरात मात्र गृहमंत्र्यांची ही दोन खातीच आपसात भिडली. ऊर्जा आणि गृह ही दोन्ही अत्यंत
महत्वाची खाती असून जनतेच्या अत्यंत जवळची आहेत. पण जनतेच्या सेवेसाठी
असलेली दोन्ही खाती एकमेकांच्या विरोधात ठाकली तर? कधी विचार केला नसेल असं
भांडणं या दोन्ही खात्यांमध्ये झाले. काय घडलाय प्रकार? सविस्तर जाणून
घेऊया.
चंद्रपुरात गृह विभाग अर्थात पोलिसांचे महावितरणचे 139 वेगवेगळे कनेक्शन्स आहेत. या वीज कनेक्शन कोटी 81 लाखांचे वीज बिल थकीत आहे. मार्च अखेर असल्याने हे थकीत बिल भरण्यासाठी महावितरणने रेटा लावला होता. मात्र बिल भरले न गेल्याने अखेर शहराच्या गिरनार चौकातील पोलीस वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचे कनेक्शन महावितरणने कापले आणि यावरूनच दोन विभागातील भांडणाला सुरुवात झाली. अगदी नळावर भांडण व्हावे तसेच पोलिसांनी सूड उगवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे एक भले मोठे पथक महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केले. आणि बाहेर निघणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गाड्या- वाहने चलान केली.
काय म्हणाले पोलीस?
यामुळे भांबावलेल्या आणि भेदरलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारा बाहेर एकच गर्दी केली. थकीत बिलापोटी पोलीस विभागवार कारवाई केल्यानंतर अशा पद्धतीने गृह अर्थात पोलीस विभाग सूड घेत असेल तर कायदा कुठे आहे? असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला तर दुसरीकडे या सर्व अफवा असून अशा पद्धतीच्या मोहिमा आम्ही अनेक विभागात नेहमी राबवितो असा पवित्रा पोलीस विभागाने घेतला आहे.
सुडाची कारवाई
पोलिसांनी एखाद्या गुंडा सारखी भूमिका घेतल्यानंतर घाबरलेल्या महावितरणने कापलेले एकमेव कनेक्शन पुन्हा जोडून दिले यात थकीत बिल भरलेच गेलेले नाही हे विशेष. आता वीज कनेक्शन कापण्याच्या दिवशीच पोलिसांनी महावितरणच्या कार्यालयापुढे चलान मोहीम का राबवली यातच सर्व आले. दोन्ही विभाग अत्यावश्यक सेवा गटात मोडतात. थकीत वीज बिल असताना अशा पद्धतीने सुडाची कारवाई करण्याइतपत मग्रुरी पोलिसांमध्ये येतेच कुठून असाही प्रश्न विचारला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.