मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारचे बॉस, एकनाथ शिंदेंचं काही चालत नसल्याचे ते दाखवत आहेत; 'मित्र'मधून ठाण्यातील 'मित्राची' उचलबांगडी होताच जोरदार टीका
महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच मित्र या संस्थेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय अजय अशर यांची उपाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक धक्का दिला आहे. बिल्डर अजय अशर हे ठाण्यातील बडे प्रस्थ असून त्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची नव्याने या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्य सचिव यांच्यासह इतर महत्त्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांचे काही चालत नसल्याचे दाखवत आहेत
दरम्यान, या नियुक्तीनंतर देवेंद्र फडणवीस हेच सरकारचे बॉस असल्याचे दाखवत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, अशर यांना बाजूला करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारचे बॉस आहेत हेच दाखवत आहेत. एकनाथ शिंदे यांचे काही चालत नसल्याचे दाखवत असल्याचा टोला सुद्धा रोहित पवार यांनी लगावला. राजकीय पुनर्वसन करण्यासाठी अनेकदा या अशा प्रकारे नियुक्त केले जातात असेही ते म्हणाले.
शिंदे यांना आणखी एक धक्का
दरम्यान, फडणवीस सरकारने नवा आदेश जारी करत अजय अशर यांची मित्रामधून हकालपट्टी केली असून उपाध्यक्षपदी दोन नव्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. या दोन नवीन उपाध्यक्षांपैकी एक अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आणि दुसरे भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील आहेत. मित्र संस्थेत यापूर्वीच नियुक्त झालेले राजेश क्षीरसागर यांना कायम ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अजय आशर यांना मित्रामधून काढून टाकण्याचा फडणवीस यांचा निर्णय हा शिंदे यांच्यासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
शीतयुद्धाची चर्चा फडणवीसांनी फेटाळून लावली होती काही निर्णयांवरून फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. तथापि, फडणवीस यांनी नुकतेच आपल्या आणि शिंदे यांच्यातील 'शीतयुद्ध'ची चर्चा फेटाळून लावली होती आणि म्हटले होते की काही लोकांना कथा तयार करण्यात सलीम-जावेद यांच्याशी स्पर्धा करायची आहे. आम्हा दोघांना ओळखणाऱ्या लोकांना आम्ही एकत्र आल्यावर काय करतो ते कळेल, असे ते म्हणाले होते. फडणवीस यांनी आपल्या पूर्वसुरींनी घेतलेले निर्णय रखडल्याचे वृत्तही फेटाळून लावले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.