मुंबई: मुंबईसह राज्यात मराठी सक्तीची मागणी होत असताना दुसरीकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याने केलेल्या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी शिकणे गरजेची नसल्याचे वक्तव्य संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. त्याशिवाय, गुजराती ही घाटकोपरची भाषा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. विशेष यावेळी मंचावर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. मुंबईत मराठी आणि अमराठीचा वाद सुरू
आहे. मराठी माणसांना घरे नाकारणे, त्यांच्यावर बंधने घालण्यापासून ते
कार्यक्रम साजरे करण्यास मज्जाव करण्यापर्यंतचे वाद मागील काही
महिन्यांमध्ये समोर आले आहेत. त्यातच आता भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याने
नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी बोलत होते. त्यावेळी ते बोलत होते. भैय्याजी जोशी यांनी म्हटले की, मी मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन करतो, आजच्या कार्यक्रमानंतर जाम साहेब यांचे सुद्धा नाव चर्चेत असेल. या ठिकाणी आल्यावर मला महाराणा प्रताप यांचे नाव डोळ्यासमोर आलं. महाराणा प्रताप आणि अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आपण ऐकलं आहे. ज्यांच्याबद्दल आज आपण ऐकलं आहे, असे जाम साहेब सुद्धा आहेत. आपल्यातल्या अनेकांनी त्यांना पाहिलं आहे. मुंबई ते कन्याकुमारी त्यांनी काम केलं आहे. जामसाहेब यांचे नाव या संस्थेला आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.बिर्ला मंदिर अनेक ठिकाणी आहेत, बिर्ला यांनी अनेक मंदिर बांधले पण आतमध्ये देवता कोण आहे, त्यात जाऊन पहावं लागतं. चांगलं जीवन साधनेमधूनच प्राप्त होतं. अशा प्रकारची मधुरता त्यांच्या बोलण्यात होती असेही त्यांनी म्हटले.
भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत काय म्हटले?
भैय्याजी जोशी यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले.
संघाच्या शाखेत काम करणारा ईश्वरी कार्य करणारा...
भारताच्या परंपरेत असे महापुरुष असतात असे महापुरुष स्वतःला अहंकारापासून मुक्त करण्यासाठी आपण जे कार्य करतो ते ईश्वराचा कार्य आहे असं म्हणतात. म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असं शिवाजी महाराज म्हणायचे, असे त्यांनी म्हटले. . संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो असेही त्यांनी नमूद केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.