उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे रेफरल ऑडिट होणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आरोग्य संचालकांना निर्देश
अचलपूर : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर दोन दिवसांच्या मेळघाट दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी मेळघाटच्या विविध आरोग्यकेंद्रांना भेटी दिल्यात, त्यानंतर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान रुग्णालयाचे वैद्यकीय 
अधीक्षक यांच्यावर सातत्याने करण्यात येत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 
धारेवर धरत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे रेफरल 
ऑडिट करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी आरोग्यसंचालक यांना दिले.
आरोग्यमंत्री रविवारी उशिरा रात्री मेळघाटात पोहोचले. तेथे त्यांनी कर्मचारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या तत्काळ सोडवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी थेट अचलपूरचे उपजिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी झाडाझडती घेतल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना रेफर का करण्यात येते, त्याची चौकशी करण्याचे निर्देश आरोग्य संचालकांना दिले. आरोग्य संचालक खरोखरच रेफर रुग्णांचे ऑडिट करणार की चौकशी थंडबस्त्यात ठेवणार, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाका : 
उपजिल्हा रुग्णालयात एका कंपनीतर्फे कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या स्वच्छता
 कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे 
आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि कर्मचाऱ्यांना 
दोन दिवसांत वेतन त्यांच्या खात्यावर जमा झालेच पाहिजे, अन्यथा कंपनीला 
ब्लॅक लिस्ट टाका, असे स्पष्ट निर्देश आरोग्य संचालक डॉ. कमलेश भंडारी 
यांना दिले.
चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
चिखलदरा तालुक्यातील हतरू प्राथमिक आरोग्यकेंद्रात आठवड्यातून फक्त गुरुवारीच डॉक्टर उपस्थित राहत असल्याचा प्रकार सोमवारी आरोग्यमंत्र्यांसमक्ष उघडकीस आला. तसेच ब्लडशुगर तपासणीसाठी असलेले साहित्य कालबाह्य असल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन व दोन औषधनिर्माता, अशा चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.मेळघाटात कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू मोठ्या प्रमाणात आहे. या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने मेळघाटला भेट दिली. हतरू येथील उणिवेबद्दल बोलणे योग्य नाही, परंतु मेळघाट दौरा आरोग्य विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. अनेक बाबी तपासल्या आहेत, त्यावर लवकरच आरोग्ययंत्रणा सक्षम करून नागरिकांना सुविधा मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील.-प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
 
 
 
 
 
