पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यामध्ये त्यांच्या मार्गात आलेल्या एका मुलाला पोलिस उपनिरीक्षकाने चोप दिल्याची घटना गुरूवारी घडली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. आता या पीएसआयला गृह विभागाने शिक्षा दिली आहे. काही तासांतच संबंधित पोलिस अधिकाऱ्याची बदली करून वेतनवाढही रोखण्यात आली आहे.
गुजरातमधील लिम्बायत याठिकाणी ही घटना घडली होती. पंतप्रधान मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे त्यांचा ताफा जाणार असलेल्या मार्गांवर नेहमीच कडक सुरक्षाव्यवस्था असते. प्रत्यक्ष दौऱ्याआधी संपूर्ण मार्गावर सुरक्षा आणि वाहतुकीची चाचपणी घेतली जाते. ही तयारी सुरू असताना लिम्बायतमध्ये एक शाळकरी मुलगा सायकलवर मार्गात आला होता.
मार्गावर ड्युटीला असलेले पोलिस उपनिरीक्षक बी. एल. गढवी यांनी संबंधित मुलाला हटकले. गढवी यांनी मुलाच्या तोंडावर ठोसा लगावला. त्याचे केस जोरजोरात ओढले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित पोलिस उपनिरीक्षक गढवी यांना शिक्षा दिली आहे.
गढवी यांची सुरतमधून मोरबी याठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसेच एक वर्षासाठी त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मोदी शुक्रवारी सायंकाळी लिम्बायत येथे एका कार्यक्रमानिमित्त येणार होते. त्यासाठी गुरूवारी ताफ्याच्या मार्गावर तयारीची चाचपणी घेतली जात होती. यादरम्यान ही घटना घडली. लिम्बायतमधील मुख्य रस्त्यावर तयारी सुरू असताना सायकल चालवत असलेला एक मुलगा गढवी यांना दिसला. त्यांनी संबंधित मुलाला थांबवून त्याचे केस पकडले आणि जोरजोरात ओढले. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ एका व्यक्तीने इमारतीवरून घेतला आहे.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी सुरत वाहतूक शाखेच्या उपायुक्त अनिता वनानी यांनी सांगितले की, 'संबंधित पोलिस उपनिरीक्षकांना पंतप्रधानांच्या बंदोबस्तापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांना कंट्रोल रूममध्ये ड्यूटी देण्यात आली आहे.' त्यानंतर विशेष शाखेचे उपायुक्त हेतल पटेल यांनी प्रसिध्दीपत्रक काढत गढवी यांची मोरबी येथे बदली करण्यात आल्याची माहिती दिली. पोलिस एवढ्यावर थांबले नाहीत. लिम्बायत पोलिसांनी संबंधित मुलाचा शोध घेऊन पोलिस ठाण्यात आणले आणि त्याचा जबाब घेतला. संबंधित मुलगा काही दिवसांपूर्वी नेपाळमधून सुरतमध्ये आला आहे. तो त्यांच्या नातेवाईकांकडे राहत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.