Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हेलिकॉप्टरने फिरतो, पैशांची बंडलं उडवतो, अनेकांच्या जीवावर उठलेल्या खोक्याचा आका कोण? मकोका लावण्याची मागणी

हेलिकॉप्टरने फिरतो, पैशांची बंडलं उडवतो, अनेकांच्या जीवावर उठलेल्या खोक्याचा आका कोण? मकोका लावण्याची मागणी
 

बीड : जिल्ह्यात आकाची गँग जेलमध्ये गेली, पण आता नवा 'खोक्या' उदयाला आलाय. अमानुष मारहाण करणाऱ्या गावगुंडाची दहशत महाराष्ट्रासमोर आली. आता त्याचे अनेक काळे कारनामे उघड होत आहेत.. राजकीय वरदहस्ताने पोसलेल्या खोक्यावर आज दोन गु्न्हे दाखल झाले पण त्याला अटक कधी होणार आणि मोक्का कधी लागणार हा प्रश्न आहे. तो हेलिकॉप्टरने फिरतो... तो पैशांची बंडलं उडवतो... तो फाईव्ह स्टार हॉटेलात राहातो... तो गाड्यांच्या ताफ्यात फिरतो... तो बीडचा गोल्डन मॅन आहे...

बीड जिल्ह्यातल्या गावगुंडाचा हा स्वॅग पाहून महाराष्ट्र अचंबित झालाय. सत्ता, पैसा आणि दहशतीच्या बळावर हा गावगुंड खोक्या हैवान बनून लोकांच्या जीवावर उठलाय. त्याने केलेल्या अमानूष मारहाणीचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ काल व्हायरल झाला आणि पोसलेला हा गुंडाचं क्रौर्य महाराष्ट्राच्या समोर आलं. त्याने एका व्यक्तीच्या तळपायावर बॅटने अमानुषपणे मारहाण केली.

आठवड्याभरापूर्वीच खोक्याचा एका व्यक्तीवर हल्ला, आठ दात पाडले
खोक्यानं ज्याला मारलं तो जीवंत आहे की मेला हे कुणालाच माहिती नाही. त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. दरम्यान पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आठवड्याभरापूर्वीच खोक्यानं एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. भेदरलेली ती व्यक्ती रुग्णालयात जीवन मरणाची लढाई लढतीय. त्याचे समोरील आठ दात पाडले आहेत. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे आहेत. पण त्याच्यासाठी जणू ते मेडल आहेत.
बीडच्या खोक्यावर अनेक गुन्हे, सुरेश धस यांचा निकटवर्तीय

हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, प्राणघातक हल्ला, जबरदस्तीने संपत्ती मिळणं, धमकी देणं, फसवणूक, खोटी कागदपत्र बनवणं, खोटे पुरावे सादर करणं.... असे अनेक काळे कारनाम्यांनी बदनाम असेलेला नामचीन गुंड खोक्या भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे. शिवाय त्याला राजकीय पदाची संरक्षणाची कवचकुंडलं आहेत. तो भाजपचा पदाधिकारी आहे.

महागड्या गाड्यांमध्ये बसून पैशांची बंडलं उडवण्याचा खोक्याचा व्हिडीओ
आधी अमानुष मारहाणीचा झाला. त्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर येताहेत. महागड्या गाड्यांमध्ये बसून पैशांची बंडलं उडवण्याचा त्याचा माज स्पष्ट दिसतो. त्याला पोलिसांचा कसलाही धाक नाही हे विशेष.
हेलिकॉप्टरने फिरतो... मुंबईत खोक्याचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलात

पैशांची बंडलं उडवताना त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. काहींना वाटेल की हा भुरटा गुंड आहे. पण तसं नाही... त्याने शाळेचं तोंड पाहिलंय की नाही माहिती नाही. त्याचा कामधंदा काय माहिती नाही पण तो हेलिकॉप्टरने फिरतो... मुंबईत त्याचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलात असतो.

... तरच बीडला लागलेली गुन्हेगारीची कीड नियंत्रणात येईल
बीडमधली कराड गँग जेलमध्ये गेली. पण आता बीडमध्ये हैदोस घालणारा खोक्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देतोय. लोकांच्या जीवावर उठतोय. त्याने कुणाचा जीव घेण्याआधीच त्याच्या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करणं गरजेचं आहे. तरच बीडला लागलेली गुन्हेगारीची कीड नियंत्रणात येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.