गावात झाली, आता राज्यभरात बंदी घाला; शिव्यांवरील बंदीसाठी सरपंचाचं आमरण उपोषण
गावाचा विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायत आणि गावचे सरपंच विविध उपक्रम गावात राबवत असतात. पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी योजना आणल्या जातात. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या सौंदळा गावातील सरपंचाने एक अगळा-वेगळा उपक्रम हाती घेतलाय. माता-भगिनींचा सन्मान राखण्यासाठी त्यांनी गावात शिव्यांना बंदी घातलीय. आता आया-बहिणींचा सन्मान करण्यासाठी या सरपंचाने थेट उपोषणाचा एल्गार उगारलाय.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वी ग्रामसभेचा ठराव घेऊन गावात शिव्याबंदीचा ठराव घेण्यात आला. जो कोणी शिवी देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला. आता शासनाने देखील राज्यभरात शिव्या बंदीचा निर्णय घेऊन माता भगिनींचा सन्मान करावा, या मागणीसाठी सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय.
छोटे मोठे भांडण झाल्यावर माता भगिनींचा काही संबंध नसताना अनेकदा शिव्यांचा माध्यमातून महिलांना अपमानित केले जाते. तसेच शिव्यांचे रूपांतर मोठ्या वादात होऊन पोलीस स्टेशन, कोर्टापर्यंत प्रकरण जातात. त्यामुळे वेळ पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने शिव्या बंदीचा ठराव करून माता-भगिनींचा सन्मान केलाय.
गावात शिव्या देणाऱ्या व्यक्तीस 500 रुपये दंड आकारण्यात येतो, त्यामुळे शिव्या देणे थांबले असून त्याचे सकारात्मक परिणाम गावात दिसू लागले आहेत.. महाराष्ट्र शासनाने देखील राज्यभरात शिव्या बंदीचा कायदा आणून माता-भगिनींचा सन्मान करावा अशी मागणी सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांनी केली आहे. आरगडे यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.


