Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'केडीसीसी'च्या वारणानगर शाखेत तीन कोटी 21 लाखांचा अपहार

'केडीसीसी'च्या वारणानगर शाखेत तीन कोटी 21 लाखांचा अपहार
 

वारणानगर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर (ता. पन्हाळा) शाखेत पे स्लिपवर तसेच धनादेशाद्वारे बोगस व खोट्या सह्या करून तसेच खातेदारांचे नावे बनावट खाती उघडून तीन कोटी 21 लाख 91 हजार 619 रुपयांचा अपहार करण्यात आला.

याप्रकरणी कारकून मुकेश विलास पाटील (51, रा. माले, ता. पन्हाळा), शिवाजी शहाजी पाटील (50, रा. आरळे, ता. पन्हाळा), मीनाक्षी भगवान कांबळे (50, रा. निवृत्ती कॉलनी, कोडोली, ता. पन्हाळा) व शरीफ मुन्ताज मुल्ला (रा. कोडोली) या तिघा रोखपालांसह चौघांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पोवार (रा. कळे) याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आर्थिक घोटाळ्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेची पोलिसात फिर्याद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कोल्हापूर शाखेचे उपव्यवस्थापक बाळासो हरी बेलवळेकर (रा. कुरुकली, ता. कागल) यांनी कोडोली पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.29) फिर्याद नोंदवली आहे.
खोट्या सह्या करून फसवणूक

15 जुलै 2021 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये तत्कालीन शाखाधिकारी तानाजी पोवार, शिवाजी पाटील, मुकेश पाटील, मीनाक्षी कांबळे, शरीफ मुल्ला या पाचजणांनी संगनमताने बँकेची आर्थिक फसवणूक केली. त्यांनी विश्वासघाताने पे स्लिप व धनादेशावर खोट्या सह्या करून तसेच खातेदारांचे नावे बोगस खाती उघडून त्यातून रकमा काढून घेतल्या.

बंद खात्यावरील रकमा काढल्या
बंद खात्यावरील रकमा काढून घेऊन त्यासाठी कर्मचार्‍यांचा युजर आयडी पासवर्ड वापरला. त्याचबरोबर आर्थिक व्यवहारासंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे, केवायसी तपासणी दरम्यान वरील आरोपींना मागणी करूनही दिली नाही. त्यांनी तीन कोटी 21 लाख 91 हजार 619 रुपयांचा इतक्या रकमेचा अपहार करून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, वारणानगर शाखेची फसवणूक केली म्हणून बँकेतर्फे फिर्याद नोंदवली आहे. शाखाधिकारी तानाजी पोवार याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, कोडोली पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक कैलास कोडग तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.