Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तरुणांना नशामुक्त करण्यासाठी पोलीस इन अॅक्शन, सांगलीतील 59 'डार्क स्पॉट 'वर करडी नजर

तरुणांना नशामुक्त करण्यासाठी पोलीस इन अॅक्शन, सांगलीतील 59 'डार्क स्पॉट 'वर करडी नजर


तरुणाईला नशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा पोलिसांनी सांगली विभागातील नशेसाठी वापरले जाणारे अडगळीचे 59 'डार्क स्पॉट' शोधले आहेत. या ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहणार असून, येथे नियमित भेटी देणे, पाहणी करण्याचे आदेश बीट मार्शलना देण्यात आले आहेत. याठिकाणी नशा, मद्यपान तसेच गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तसेच याठिकाणी महापालिकेने स्ट्रीट लाईट लावून 'अंधार' दूर करावा, सीसीटीव्ही लावावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नशाखोरांच्या अनुयांवर हल्ला करत पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

 
सांगली शहरासह जिल्ह्यात नशेखोरीचे प्रमाण वाढले होते. यातून गुन्हेगारी कृत्ये वाढली होती. याला आळा घालण्यासाठी आता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मास्टर प्लॅन आखला आहे. या माध्यमातून स्थानिक गुन्हे अन्वेषण मिरज, सांगली शहर पोलिसांनी कारवाईचा धडका सुरू केला. एमडी ड्रग्ज, नशेची इंजेक्शन्स, गांजा, नशेच्या गोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'टास्क फोर्स' स्थापन करत माहिती देणाऱ्यांसाठी थेट पारितोषिक जाहीर केले. तसेच पोलीस दलाचेही कौतुक केले. प्रत्येक सोमवारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली जाते. त्यातूनच शहरातील नशेखोरीचे अड्डे शोधण्यात आले. प्रामुख्याने शहर, विश्रामबाग आणि संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 34 'डार्क स्पॉट' पोलिसांनी शोधून काढले. अन्यत्र आणखी स्पॉट आहेत. त्याठिकाणी तातडीने स्ट्रीट लाईटची सोय उपलब्ध करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. काही ठिकाणी दिवे लावण्यात आले. अन्यत्र लवकरच लावले जातील, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शहरातील या 'डार्क स्पॉट' प्रमाणे जिल्ह्यातील सर्व ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. तशा सूचना घुगे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पोलीस दलास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. डार्क स्पॉटवर सातत्याने पोलिसांनी व्हिजिबल पोलिसिंग केल्यास खुल्या भूखंडावर, मोकळ्या जागेत नशेचे जे प्रकार घडत आहेत त्याला निश्चितच चाप बसणार आहे.

 
नशेखोरीला पायबंद घालण्यासाठी कठोर कारवाई

अंधाराचा फायदा घेऊन काही नशेखोर तरुण गैरकृत्य करत असतात. याठिकाणी नशा तसेच मद्याचे सेवन केल्यानंतर त्याठिकाणाहून बाहेर आल्यानंतर गुन्हा घडण्याची शक्यता असते. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील डार्क स्पॉट शोधले आहेत. याठिकाणी दररोज सायंकाळी सात ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत गस्त घालण्यात येणार आहे. यासाठी पोलीस अधीक्षकांनी चार पथके तैनात केली आहेत. दोन मिरज आणि दोन सांगली अशी पथके गस्त घालणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. सांगली शहरातील प्रमुख 'डार्क स्पॉट' सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत वसंतदादा समाधी व वॉटर हाऊस, अमरधाम स्मशानभूमीजवळ, सांगलीवाडी येथे कृष्णा नदीवरील बंधारा, सिद्धार्थ बुद्धविहार परिसर, मुजावर प्लॉट बसस्थानकाजवळ, अल्-अमिन शाळेजवळील परिसर श्यामरावनगर, 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलेज परिसर, कार्निव्हल हॉटेलजवळ काळी वाट, श्यामरावनगर, स्वामी समर्थ घाट, कृष्णा घाट, गणेश मार्केट, आंबेडकर स्टेडियम, पन्नास फुटी रोड गादी कारखाना परिसर, कोल्हापूर रस्ता टी जंक्शन, हरिपूर रस्ता लिंगायत समाज स्मशानभूमी. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्द भीम कट्टा, महावीर ब्रिज, राममंदिर, ओव्हरसीअर कॉलनी, तक्षशीला रोड, रेल्वे स्टेशन परिसर, हसनी आश्रम, कुंभार मळा, विजयनगर, मार्केटयार्ड कब्रस्तान परिसर, विलिंग्डन कॉलेज मैदान, मैत्रेय बिल्डिंग वान्लेसवाडी. संजयनगर पोलीस ठाणे हद्द संपत चौक परिसर, माधवनगर स्मशानभूमी, लक्ष्मी थिएटर परिसर, राम जानकी मंदिर परिसर संजयनगर, वसंतनगर मैदान परिसर, नवभारत हायस्कूल मैदान, आयटीआय कॉलेज ते पाईप कारखाना परिसर, रेल्वे स्टेशन रोड ते म्हसोबा मंदिर परिसर, ऊर्मिलानगर विहीर, यशवंतनगर पाण्याच्या टॉकिजजवळील मोकळे मैदान. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.