सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा कोर्टात युक्तिवाद; न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची दुसरी सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत, शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली.
संबंधित तपास अधिकाऱ्याने २८ आरोपींना नोटीस बजावून, चौकशीत त्यांनी काय बोलले पाहिजे? हे नमूद केल्याची बाब ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली, तसेच ही निष्पक्ष चौकशी नसल्याचे मांडले.
यामुळे चौकशी प्रक्रियेत निष्पक्षतेचा अभाव असून, ती दबावाखाली केली जात असल्याची बाब ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत, संबंधित तपास अधिकाऱ्याच्या कामावर स्थगिती दिली आहे. तसेच, त्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये, तसेच कोणताही चौकशी अहवाल सादर करू नये, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिला आहे.
SIT स्थापन करण्याबाबत निर्णय, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर काय निर्णय घ्यावा? याबाबत कायद्यात अस्पष्टता आहे. याविषयी देखील पुढील सुनावणीला चर्चा होणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला की, ही चौकशी फॉरेन्सिक पोस्टमार्टम अहवालाच्या विरोधी दिशेने चालली आहे. सरकारने नियुक्त केलेली चौकशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे झाल्याच्या दिशेने नेली जात होती. चौकशीतील दिशाभूल व पूर्वग्रहदूषित तपास प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिला. या प्रकरणी पुढील सूनवाई ८ मे २०२५ होणार आहे.
आम्हाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी लढताय. त्यांच्यावरच आमचा विश्वास आहे. मला कायद्यातील काही कळत नसले तरी बाळासाहेब आंबेडकर यांना सर्व कळतं आणि ते जे करताय ते योग्यच आहे, असं सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.