Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी..; तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप

हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी..; तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप
 

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. प्रसूतीच्या कळा सुरू झालेल्या तनिषा सुशांत भिसे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं असता, प्रशासनाने उपचारापूर्वी 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

अडीच लाख रुपये देण्याची तयारी असतानाही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या रुग्णालयात हलवताना तनिषाची प्रकृती खालावली आणि जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे शहरात संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिनानाथ मंगेशकर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे पुण्यातील आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी दगावली. तनिषा आणि तिचे कुटुंब खरं तर आनंदात होते. तनिषा गरोदर होती आणि तिला जुळी मुलं होणार होती. मात्र, अचानक सातव्या महिन्यात तिला प्रसूती कळा सुरू झाल्या… म्हणून तिला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेले, तर आधी १० लाख भरा मगच हॉस्पिटल मध्ये एडमिशन मिळेल असा पवित्रा तिथल्या निर्ढावलेल्या डॉक्टरांनी घेतला. हे पाहून तनिषाचे मनोबल खचले. ज्या डॉक्टरांनी धीर द्यायला हवा त्या डॉक्टरांनी थेट दुकानदारी दाखवली होती, असा आरोप वाघ यांनी पोस्टच्या माध्यमातून केला आहे.

मंत्रालयातून देखील मंगेशकर हॉस्पिटलला कॉल केला तरीही मुर्दाड मनाच्या डॉक्टरांना काही फरक पडला नाही. मनीषा प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत राहिली पण मेलेल्या मनाच्या डॉक्टरांना दिसत नव्हते. खरं तर आज एका आमदाराच्या निकटवर्तीयाच्या जीवावर बेतलं सर्वसामान्य रुग्णांचे काय हाल करत असतील याचा विचार न केलेला बरा. चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमधून रुग्णांना असंवेदनशील आणि अमानवीय वागणूक मिळत असेल, तर त्या रुग्णालयांना टाळे ठोका आणि अशा असंवेदनशील डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा, अशी मागणी देखील वाघ यांनी केली आहे. एकाला कायद्याचा दणका बसला तर बाकीचे तरी सुधारतील, असे देखील त्या म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?

तनिषा भिसे यांना 29 मार्च रोजी प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं होतं. कुटुंबीयांचा दावा आहे की, रुग्णालयाने 10 लाख रुपये जमा करण्याची अट घातली आणि अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवूनही तिला दाखल करून घेतलं नाही. परिणामी, तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं, पण वाटेतच तिची तब्येत बिघडली. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, पण स्वतःचा जीव वाचवू शकली नाही. तनिषाचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रुग्णालयाला संपर्क साधला, तरीही प्रशासनाने ऐकलं नाही. या घटनेनंतर आमदार गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदवली आहे.

अमित गोरेखे यांचा आरोप काय?
दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला ती आमदार गोरखे यांचे पीए संतोष भिसे यांची पत्नी होती. तनिषा सुशांत भिसे असं या मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचं नाव आहे. तनिषा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी दिनानाथ रुग्णालयानं 10 लाखांची मागणी केली होती. कुटुंब अडीच लाख भरण्यासाठी तयार असताना देखील या महिलेला ॲडमिट करण्यात आलं नाही. रुग्णाची अवस्था सिरिअस असताना देखील रुग्णालयानं त्यांना ॲडमिट केलं नाही, असा आरोप गोरखे यांनी केला आहे. आपन या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत उचलणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.